‘सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ?’
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेच्या बसच्या फलकावरील लिखाणातील प्रश्न !
डोंबिवली (जिल्हा ठाणे) – ‘सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ?’, असा प्रश्न येथील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसगाडीच्या फलकावरील लिखाणात विचारण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या शाळेच्या बसगाड्यांच्या पाठीमागे विविध प्रबोधनात्मक लिखाणाचे फलक लावले आहेत आणि नागरिकांसाठी ते औत्सुक्याचा विषय ठरले आहेत.
यांपैकी एका फलकावर पुढीलप्रमाणे लिखाण आहे. ‘नैमित्तिक राष्ट्रभक्ती, उदासीन प्रशासन, राजकीय धुळवड, भ्रष्टाचार, टोकाची धार्मिक वृत्ती, अशा अनेक समस्या आणि अडचणी, तसेच या प्रश्नांमुळे बेजार असलेला आपला लोकशाही देश (आहे असे म्हणणारा) ७५ वर्षे पूर्ण करत आहे. प्रत्येक भारतियाला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे; पण सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ? आपल्याला मोठ्या प्रमाणात निःस्वार्थी लोकप्रतिनिधी कधी मिळतील ? जनतेच्या समस्या तत्परतेने दूर करणारे प्रशासन कधी मिळेल ? जनता आपले हक्क आणि दायित्व ओळखून कधी वागेल ?’’
‘फलकावरील संपूर्ण मजकूर वाचल्याविना बस चालू करू नका’, असे नागरिक चालकाला सांगत आहेत.