दाऊदचा ‘आइकमन’ होणार ?
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) पाकमध्ये लपलेला आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मुंबईत काम करणारा सलीम फ्रुट याला नुकतीच अटक केली. त्याची चौकशी केली असता दाऊदची टोळी मुंबईत गोळा करत असलेला पैसा विविध माध्यमांद्वारे जिहादी आतंकवादी संघटनांना पाठवत असल्याचे समोर आले. दाऊद भारतात देशविघातक कारवायांमध्ये गुंतला असल्याची माहिती भारतासाठी तशी नवीन नाही. मुंबईच्या गुन्हेगारी जगतात अजूनही त्याचा वरचष्मा आहे. त्याच्या विरोधातील सर्व माहिती आणि पुरावे भारताकडे आहेत; मात्र त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर कारवाई होण्यासाठी पावले उचलली जात नाहीत, हे लज्जास्पद आहे. मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये साखळी बाँबस्फोट घडवून दाऊद भारतातून पसार झाला. याला २९ वर्षे लोटली आहेत; मात्र त्याला फासावर लटकवण्याची भारतियांची इच्छा अजूनही अपूर्णच आहे. भारतात कारवाया करणारे दाऊद इब्राहिम, मसूद अझर, हाफीज सईद, झाकीर लखवी हे पाकमध्ये निवांत बसून भारताचे इस्लामीस्तान करण्याची स्वप्ने बघत आहेत आणि भारतीय मात्र त्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत. ही शृंखला कधी थांबणार ? ‘दाऊद आणि अन्य आतंकवादी यांचा ‘आइकमन’ कधी होणार ?’, हे सरकारला विचारण्याची वेळ आता आली आहे. अडॉल्फ आइकमन हा हुकूमशहा हिटलर याचा उजवा हात ! हिटलरने ६० लाख ज्यूंचे शिरकाण केले. त्यात लेफ्टनंट कर्नल अडॉल्फ आइकमन याचा हात होता. दुसर्या महायुद्धात जर्मनीचा पाडाव झाला. त्या वेळी आइकमन याने जर्मनीतून पळ काढून दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनात आश्रय घेतला. तेथे तो वेगळ्या नावाने राहू लागला. इस्रायलने त्याला शोधण्याची मोहीम हाती घेतली. इस्रायल आणि अर्जेंटिना हे अंतर १२ सहस्र ७५६ किलोमीटर आहे. हे अंतर कापून इस्रायलचे हेर तेथे पोचले आणि अतुलनीय साहस दाखवून आइकमन याला फरफटत इस्रायलमध्ये आणून फासावर लटकवले. वर्ष १९४८ मध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच्या १ वर्षानंतर इस्रायल स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. या दोन्ही देशांनी देशाच्या उत्कर्षाच्या दिशेने एकाच वेळी पावले उचलली; मात्र आज इस्रायल भारतापेक्षा बर्याच क्षेत्रांत कैकपटींनी पुढे आहे. राष्ट्रवाद हे त्यामागील प्रमुख कारण ! इस्रायल अस्तित्वात आल्यानंतर साधारण १४ वर्षांनी आइकमनसारख्या क्रूरकर्म्याला शिक्षा करण्यात तो यशस्वी झाला. भारत-पाक फाळणी, बांगलादेश युद्ध आणि त्यानंतर विविध घटना यांमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला अन् आजही होत आहे; मात्र इस्रायलप्रमाणे वंशविच्छेद करणार्यांना यमसदनी पाठवण्याची उर्मी भारताच्या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी दाखवली नाही. भारत सरकारने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये राष्ट्रवाद जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम हाती घेतली. तिला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘राष्ट्रहितासाठी आता सरकारने धडक मोहिमा हाती घ्याव्यात’, अशी जनतेची अपेक्षा आहे.
भारत आतंकवादमुक्त व्हावा !
राष्ट्र बलशाली होण्यासाठी अनेक सूत्रे कारणीभूत असतात. यात शत्रूपासून रक्षण करणे आणि शत्रूला संपवणे, ही दोन्ही सूत्रेही ओघाने आलीच. एखादा समूह किंवा देश यांवर अत्याचार करणारा मोकाट राहिला, तर हिंसा अथवा अत्याचार करण्याची त्याची मनोवृत्ती अधिकच बळावते. इस्रायलने अर्जेंटिना, उरुग्वे आदी देशांमध्ये जाऊन ज्यू विरोधकांना संपवले किंवा त्यांना त्या देशातच ठार मारले. ज्यूंकडून अजूनही ‘नाझी हंट’ (नाझींची शिकार) थांबलेले नाही. अलीकडील एका वृत्तानुसार, लॅटिव्हिया या युरोपातील देशात एका ९७ वर्षीय नाझी महिलेचा ज्यू शोध घेत आहेत. या महिलेने ती १४-१५ वर्षांची असतांना लॅटिव्हियामधील ज्यू धर्मीय बालकांना चिरडून मारले होते. ‘वेळ निघून गेली किंवा मारेकरी वृद्ध झाले; म्हणून त्यांनी केलेल्या जघन्य अपराधांची तीव्रता अल्प होत नाही’, हा ज्यूंचा सिद्धांत ! या सिद्धांतानुसार त्यांच्या कारवाया चालूच आहेत. त्यामुळेच ज्यूंची हत्या करण्याचा आदेश देणारे, त्या आदेशाची कार्यवाही करणारे, जेथे हत्या झाल्या, त्या कॅम्पमधील सुरक्षारक्षक आदी सर्वांना शोधून त्यांना शिक्षा होण्यासाठी ज्यूंनी प्रयत्न केले. जसा एकेकाळी ज्यूंना संपवण्याचा प्रयत्न झाला, तसा १ सहस्र वर्षांहून अधिक काळ हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. जिथे एका समुहाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो, तेथे ते संपवण्यास उत्तरदायी असणार्यांचा प्रतिकार अपरिहार्य ठरतो. हा प्रतिकार करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते; मात्र शत्रूला संपवणे, हीच योग्य आणि दूरगामी पद्धत म्हणता येईल. ही दूरगामी पद्धत अवलंबण्याएवढी क्षमता भारतामध्ये आहे; मात्र तिचा वापर होतांना दिसत नाही. भारतात आतंकवादी कारवाया करणार्यांचा म्होरक्या पाकमध्ये रहातो. त्यामुळे कारवाया करणारे आतंकवादी पकडले किंवा मारले गेले, तरी म्होरक्या सुरक्षित असल्यामुळे तो अधिकाधिक कारवाया घडवून आणतो. यातून आतंकवादी कारवायांची कधी न संपणारी साखळी वाढतच जाते.
राष्ट्र अस्थिर असल्यास त्याच्या उत्कर्षाची गती मंदावते. भारतात विकासकामांना गती आली आहे; मात्र शत्रूराष्ट्रे आणि भारतद्वेष्टे यांच्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता देशाच्या विकासाच्या मुळावर उठली आहे. हे थांबवण्यासाठी आता भारत सरकारने ‘भारतद्वेष की सजा, फांसी की सजा’, अशी मोहीम राबवावी. या मोहिमेला जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल. काश्मीरपासून पाकची राजधानी इस्लामाबादचे अंतर हे २१७ किलोमीटर आहे. भारत सरकारने मनात आणले, तर हे अंतर भारतीय सैन्याला कापणे सहज शक्य आहे. दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
भारतविरोधी कारवाया करणार्या आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून धडा शिकवण्याची मोहीम भारताने राबवावी ! |