सलमान रश्दी यांच्यावरील आक्रमणात आमचा हात नाही ! – इराण

आक्रमणमर्ता हा मात्र इराणचा कट्टर समर्थक !

डावीकडे सलमान रश्दी

तेहरान (इराण) – न्यूयॉर्क येथे १२ ऑगस्टला एका कार्यक्रमात भारतीय वंशाचे मूळचे अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणात आमचा हात नाही, असा खुलासा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. हादी मातर या २४ वर्षीय युवकाने रश्दी यांच्यावर चाकूद्वारे आक्रमण केले होते. यात ते गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांचा एक डोळा जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मातर याचे अन्वेषण केले असता तो कट्टर इराणसमर्थक असल्याचे समोर आले आहे. ८० च्या दशकामध्ये ‘सटॅनिक व्हर्सेस’ (सैतानाची आयते (वाक्ये)) पुस्तक लिहिल्यामुळे रश्दी यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या. इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी वर्ष १९८९ मध्ये रश्दी यांच्या विरोधात फतवा काढला होता. आक्रमणकर्ता मातर याने त्याच्या फेसबूकवर अयातुल्ला खोमेनी आणि आताचे इराणचे प्रमुख अयातुल्ला खामेनी यांची छायाचित्रे ठेवली आहेत. अमेरिकी मीडिया समूह ‘एन्.बी.सी.’नुसार हादी मतार यानेने इराण आणि खामेनी यांचे वैयक्तिक सैन्य ‘रिवोल्यूशनरी गार्ड्स’च्या समर्थनार्थही अनेक पोस्ट्स केल्या आहेत. त्याने शिया कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळण्यासाठीही पोस्ट्स केल्या आहेत.

ररश्दी यांच्यावरील आक्रमण हे षड्यंत्र ! – अमेरिका

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन म्हणाले, ‘‘सलमान रश्दी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक आहेत. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह धार्मिक स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य यांच्या सार्वभौमिक अधिकारांसाठी नेहमीच आवाज उठवता. रश्दी यांच्यावरील आक्रमण हे एका षड्यंत्राच्या अंतर्गत करण्यात आलेले आक्रमण आहे. त्यांनी दावा केला की, रश्दी यांच्या विरोधात इराणने पुष्कळ काळ हिंसा भडकावली.