जिहादी आतंकवाद्यांचा ठावठिकाणा शोधून देतांना वीरमरण आलेल्या सैन्य दलाच्या श्‍वानाला मरणोत्तर पुरस्कार !

‘एक्सल’ श्‍वानाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार

नवी देहली – भारतात शत्रूशी लढतांना शौर्य दाखवल्यावर सैनिकांना विविध पुरस्कार दिले जातात; मात्र एका श्‍वानाला त्याने दाखवलेल्या शौर्यासाठी मरणोत्तर पुरस्कार देण्याची बहुतेक पहिलीच घटना समोर आली आहे. भारतीय सैन्य दलाचा श्‍वान ‘एक्सेल’ याला मरणोत्तर ‘मेंशन-इन-डिस्पॅच’ हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. काश्मीरमधील बारामुला येथे ३० जुलै २०२२ या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी त्याच्यावर रायफलीतून १० गोळ्या झाडल्या. यात त्याला वीरमरण आले. तो ‘बेल्जियन मॅलिनोइस’ जातीचा श्‍वान होता.

जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. तेथील एका खोलीत आतंकवादी लपले होते. त्यांनी श्‍वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने पुढील कारवाई करत आतंकवाद्यांना ठार मारले. जर सैनिक थेट त्या घरात घुसले असते, तर त्यांचे प्राण जाऊ शकले असते.