वैभवशाली राष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट करणारी यजुर्वेदातील प्रार्थना !
यजुर्वेदामध्ये देशाच्या पराधीनतेवरील उपाय दिलेला आहे. त्यामध्ये खर्या अर्थाने वैभवशाली राष्ट्र निर्माण व्हावे, याकरता प्रार्थना करण्यात आली असून तशी परिस्थिती भारतात त्या वेळी होती.
ॐ आ ब्रह्मन्ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम् ।
अस्मिन्राष्ट्रे राजन्य इषव्यः शूरो महारथो जायताम् ।
द्रोग्ध्री धेनुर्वोढाऽनड्वानाशुः सप्तिः पुरन्ध्रिर्योषा जिष्णू
रथेष्ठाः सभेयो युवाऽस्य यजमानस्य वीरो जायताम् ।
निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु फलिन्यो न ओषधयः पच्यन्ताम् ।
योगक्षेमो नः कल्पताम् ॥ – यजुर्वेद, अध्याय २२, कण्डिका २०
अर्थ : हे शक्तीमान परमेश्वरा ! आमच्या राष्ट्रात ब्राह्मतेजयुक्त ब्राह्मण उत्पन्न होवोत. शूर, लक्ष्यवेध करण्यात कुशल, शत्रूंना पराभूत करणारे महारथी क्षत्रिय उत्पन्न होवोत. गायी पुष्कळ दूध देणार्या असोत. बैल पुष्ट, खूप भार वहन करणारे असोत. घोडे वायूपेक्षाही अधिक वेगवान असोत. स्त्रिया सर्वगुणसंपन्न, बुद्धीमान आणि नगरांचे नेतृत्व करणार्या असोत. युवक रथी, महावीर, जयशाली पराक्रम करणारे आणि सभेसाठी उपयुक्त सभासद असे सिद्ध होवोत. आमच्या राष्ट्रात योग्य वेळी; पण जेव्हा जेव्हा आम्हाला आवश्यकता वाटेल, त्या त्या वेळी मेघ वर्षा करोत. वनस्पती (वृक्ष) पूर्ण वाढ झालेल्या आणि फलयुक्त असोत. (अन्न आणि फळे विपुल प्रमाणात उपलब्ध असोत.) आमचा योगक्षेम उत्तम रितीने चालत राहो.