चिंचवड (पुणे) येथे ३०० क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव उपक्रम
चिंचवड (जिल्हा पुणे) – ‘ज्या क्रांतीकारकांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यांचे स्मरण व्हावे’, या उद्देशाने ३०० क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील क्रांतीवीर चापेकरनगर येथे महानगपालिकेचे नगरसेवक नामदेव ढाके यांनी आयोजित केले आहे. या उपक्रमाअंतर्गत वर्ष १८५७ ते १९४७ पर्यंतची चित्रफीत आणि स्वातंत्र्याच्या काळात बलीदान दिलेल्या क्रांतीकारकांची चित्रफीत दाखवली जात आहे. हे प्रदर्शन १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व नागरिकांसाठी चालू असणार आहे. तरी ‘सर्व राष्ट्रभक्त आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या अनमोल प्रदर्शनाचा लाभ घ्यावा’, असे आवाहन नामदेव ढाके यांनी केले आहे.