भारताचा खरा इतिहास युवा पिढीला सांगणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
विद्यमान पिढी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आली असल्यामुळे पारतंत्र्याच्या काळात जनतेचा छळ आणि सोसावे लागलेले कष्ट यांची त्यांना कल्पना नाही. काँग्रेसनेही देशाचा खरा इतिहास न सांगता ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास आपल्या माथी मारला. ‘भारत हे पराभूतांचे राष्ट्र आहे’, ‘आपणाला स्वातंत्र्य ब्रिटिशांनी दिले’, ‘रक्ताचा एक थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळाले’, अशा कल्पना मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. एखादी वस्तू फुकट मिळते, तेव्हा त्याचे महत्त्व कळत नाही. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी लोकांनी प्राण दिले आहेत आणि शत्रूंचे प्राण घेतलेही आहेत. मरून आणि मारून निकराचा लढा देऊन आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. भारतातून जातांना ब्रिटिशांनी पंडित नेहरु यांना सत्तेवर बसवून ‘भारताचे राज्य ब्रिटिशांच्या धोरणानुसार चालेल’, अशी व्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये भारतावर शक, कुश, हुण, मोगल, इंग्रज यांनी २ सहस्र ७०० वर्षे केलेली आक्रमणे आपण विसरून गेलो. त्यामुळे भारतात अंतर्गत फुटीरता, आतंकवाद यांचा धोका निर्माण झाला आहे. देशात पुन्हा भाषा, प्रांत भेद निर्माण केला जात आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत. हे टाळण्यासाठी देशाच्या इतिहासाचे पुनर्विलोकन करून ते तरुण पिढी पुढे मांडणे आवश्यक आहे. त्यातून स्वातंत्र्यासाठी आपण किती अभूतपूर्व मूल्य मोजले आहे, हे देशातील युवा पिढीला कळेल. त्यातून देशाला पुन्हा गौरवान्वित करण्यासाठी प्रेरणा मिळेल.