बेंगळुरू येथे काँग्रेसकडून लावण्यात आलेले टिपू सुलतानचे फलक फाडले !
|
(मॉल म्हणजे मोठे व्यापारी संकुल)
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे काही जणांनी टिपू सुलतान याचे लावलेले फलक फाडून टाकले. हे फलक काँग्रेसकडून लावण्यात आले होते. ‘भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असतांना देशभक्तांऐवजी टिपू सुलतान याचे फलक कशासाठी ?’ असा आक्षेप फलक फाडणार्यांकडून घेण्यात आला आहे. काँग्रेसने ‘हे फलक विश्व हिंदु परिषदेकडून फाडण्यात आले’, असा आरोप केला आहे; मात्र याविषयी विहिंपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हा वाद शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र हटवण्यावरून झाल्याचे म्हटले जात आहे.
शिवमोग्गा येथील शिवप्पा नायक या ‘मॉल’च्या व्यवस्थापनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले होते. याविरोधात काही जणांनी तेथे निदर्शने केली. या निदर्शनांना विरोध करण्यासाठी हिंदु संघटनांचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कायम ठेवण्यास सांगितले; मात्र छायाचित्र काढण्यास सांगणार्यांनी तेथे धरणे आंदोलन चालू केले. त्यामुळे व्यवस्थापनाने छायाचित्र झाकून ठेवले. याला हिंदु संघटनांनी विरोध करत छायाचित्र पुन्हा मूळ स्वरूपात ठेवण्यास सांगत तेथे ‘धरणे आंदोलन’ चालू केले आहे.