डायघर (ठाणे) येथील इमारतीचा भाग कोसळला : जीवितहानी नाही
ठाणे, १३ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई जवळील डायघर गावातील जयंता अपार्टमेंट या ५ मजली इमारतीचा काही भाग १२ ऑगस्टच्या रात्री बाजूला असलेल्या चाळीतील घरांवर कोसळला, तर उर्वरीत इमारत एका बाजूला झुकली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणालाही दुखापत झालेली नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव ही इमारत सद्यःस्थितीला रिकामी करण्यात आलेली असून इमारतीचा विद्युत् पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तसेच इमारतीच्या सभोवताली असलेल्या चाळीमधील घरे रिकामी करण्यात आली आहेत. डायघर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, ‘टोरंट’ विद्युत् आस्थापनाचे कर्मचारी, महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अन् कर्मचारी, अग्नीशमन दलाचे जवान यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.