भीमा नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगावी !
प्रांताधिकारी गजानन गुरव यांचे आवाहन
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १३ ऑगस्ट (वार्ता.) – उजनी आणि वीर धरण यांतून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनेविषयी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील नदीकाठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोचणार नाही, तसेच जीवित आणि वित्त हानी होणार नाही यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत योग्य नियोजन करावे. महापुरामुळे नदीच्या काठावरील गावांमधील लोकांची घरे पुरामुळे बाधित होण्याची शक्यता आहे. अशा कुटुंबांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी केल्या.