युगांनुसार मनुष्याला भोगावे लागणारे आजार, त्यांचे स्वरूप आणि त्यांच्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !
‘अधर्माचरण आणि त्यातून निर्माण झालेले पाप’, हे प्रत्येक आजाराचे मूळ कारण आहे. सत्ययुगात सर्वजण धर्मपरायण होते. त्यामुळे तेव्हा मनुष्याला दु:ख किंवा त्रास भोगावा लागत नसे. त्रेता युगात बहुतांश मनुष्य धर्माचरण करत होते; परंतु त्यांच्याकडून कळत-नकळतपणे काही पापकर्मेही होत होती. द्वापरयुगात मनुष्याची पातळी आणखीन घसरली. त्यामुळे अनेकजण हेतूपुरस्सर पापकर्मे करू लागले. त्यामुळे मनुष्याला विविध प्रकारचे त्रास होऊ लागले. कलियुगाच्या प्रभावामुळे बहुतांश मनुष्य अधर्माचरण करतात. त्यामुळे त्यांना पुष्कळ पाप लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे दु:ख आणि त्रास भोगावे लागतात.
१. युग, मनुष्याने धर्माचरण करण्याचे प्रमाण, मनुष्याला पाप लागण्याचे प्रमाण आणि मनुष्याला होणार्या आजारांचे प्रमाण
२. कलियुगातील मनुष्याची दुर्गती आणि त्याला भोगावे लागणारे विविध प्रकारचे त्रास
कलियुगात मनुष्य अधर्माचरणी असल्यामुळे त्याचा लिंगदेह पुष्कळ प्रमाणात रज-तम प्रधान आहे. त्याचप्रमाणे मनुष्याने केलेल्या अधर्माचरणामुळे पृथ्वीवरील वायुमंडलही रज-तम लहरींनी दूषित झालेले आहे. त्यामुळे पाताळात निवास करणार्या विविध प्रकारच्या रज-तम प्रधान वाईट शक्तींचा कलियुगामध्ये पृथ्वीवर मुक्त संचार झालेला आहे. त्यामुळे इतर युगांच्या तुलनेत कलियुगातील मनुष्याला वाईट शक्तींचा तीव्र स्वरूपाचा त्रास भोगावा लागतो. पृथ्वीवरील ८० टक्के व्यक्तींच्या जीवनात वाईट शक्तींनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यांना शारीरिक स्तरावर विविध प्रकारच्या व्याधी, मानसिक स्तरावर ताण, भीती आणि मनोराज्यात रमणे, बौद्धिक स्तरावर बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे व्यक्तींनी अधर्माचरण करणे आणि वाईट शक्तींनी पछाडून त्रास देणे’, अशा प्रकारचे विविध प्रकारचे त्रास होत आहेत. मनुष्य स्वत: अधर्माचरण करत असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर तो वाईट शक्ती बनून पृथ्वीवरील त्रासदायक वातावरणात अडकून रहातो. त्यामुळे कलियुगात पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वाईट शक्तींचा संचार पुष्कळ प्रमाणात वाढलेला आहे.
३. कलियुगात धर्माचरण आणि साधना करणार्या व्यक्तींनाही वाईट शक्तींचा त्रास भोगावा लागणे
३ अ. व्यष्टी स्तरावर धर्माचरण आणि साधना करणार्या व्यक्तींना वाईट शक्तींनी त्रास देणे : कलियुगात मनुष्य आणि पृथ्वीवरील वायुमंडल यांची एकूण सात्त्विकता नष्ट झाल्यामुळे सर्वत्र वाईट शक्तींचा संचार पुष्कळ प्रमाणात वाढलेला आहे. व्यष्टी स्तरावर धर्माचरण आणि साधना करणार्या व्यक्तींकडून वातावरणात सात्त्विक लहरींचे प्रक्षेपण झाल्यामुळे विशिष्ट स्थानातील अन् वायुमंडलातील वाईट शक्तींना त्रास होतो. त्यामुळे कनिष्ठ स्तरावरील वाईट शक्ती व्यष्टी स्तरावर धर्माचरण आणि साधना करणार्या साधकांना मंद ते मध्यम स्वरूपाचा त्रास देतात.
३ आ. समष्टी स्तरावर धर्माचरण आणि साधना करणार्या व्यक्तींना वाईट शक्तींनी त्रास देणे : ठिकठिकाणी जाऊन यज्ञयाग करण्यासारखी समष्टी स्तरावर धर्माचरण करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी समाजाला उद्युक्त करणे यांसारखी समष्टी साधना करणार्या साधकांना केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर पाताळातील मोठमोठ्या वाईट शक्ती पुष्कळ प्रमाणात त्रास देतात. त्यामुळे साधकांना विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वरूपांच्या विविध त्रासांना सामोरे जावे लागते. हे त्रास केवळ साधकांनाच नव्हे, तर समष्टी संत आणि सद्गुरु यांनाही भोगावे लागतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे समष्टी आणि अवतारी परात्पर गुरु हे साधक अन् संत यांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरील वाईट शक्तींची समष्टी आक्रमणे स्वत: झेलून सहस्रो साधकांचे रक्षण करत आहेत.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाताळातील विविध प्रकारच्या वाईट शक्तींचा अभ्यास करून त्यांच्या त्रासातून साधकांचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून काढणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००० पासून साधकांना त्रास देणार्या पाताळातील विविध प्रकारच्या वाईट शक्तींचा सखोल अभ्यास केला. ‘कोणत्या पाताळातील आणि कोणत्या प्रकारची वाईट शक्ती कोणत्या साधकाला कोणत्या प्रकारचा त्रास देते’, याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि वाईट शक्तींच्या त्रासाचा प्रभाव न्यून होण्यासाठी विविध प्रकारचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधून काढले, उदा. कुटुंबात कलह होत असतील, तर हा त्रास साधकांच्या अतृप्त पितरांमुळे होत आहे’, हे लक्षात घेऊन त्यावर ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीने पछाडले असेल, तर ‘श्री हनुमते नम:।’ किंवा ‘हं हनुमते नम:।’ हा नामजप करण्यास सांगितले आणि त्या व्यक्तीची नारळाने दृष्ट काढून तो नारळ हनुमानाच्या मंदिरात फोडण्यास सांगितले. वाईट शक्तींनी साधकाची प्राणशक्ती न्यून केली असेल, तर त्याची प्राणशक्ती वाढवण्यासाठी त्याला ‘श्री गणेशाय नम:।’ किंवा ‘ॐ गँ गणपतये नम:।’ हा नामजप करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी पंचमहाभूतांच्या स्तरावरील विविध आध्यात्मिक उपायही शोधून काढले. त्यामुळे साधकांना वर्ष २००० पासून होणारे वाईट शक्तींचे सूक्ष्मातील त्रास सहन करता आले आणि वाईट शक्तींचा तीव्र त्रास भोगत साधकांची साधनाही झाली.
कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच वाईट शक्तींनी केलेल्या जीवघेण्या आक्रमणांतून सनातनच्या सहस्रो साधकांचे रक्षण होत आहे. यासाठी परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ते केवळ वाईट शक्तींच्या त्रासांपासूनच नव्हे, तर पृथ्वीवर पुन:पुन्हा जन्माला येण्याच्या या भवरोगापासूनही साधकांची मुक्ती करत आहेत’, यासाठी मोक्षगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.९.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |