मळगाव (सावंतवाडी) येथे जीर्ण कापडाचे, वेडेवाकडे कापलेले आणि अशोक चक्र मध्यभागी नसलेले राष्ट्रध्वज वितरित !

मळगावचे दक्ष नागरिक गजानन सातार्डेकर यांचे सामाजिक माध्यमांत राष्ट्रध्वजाचे वितरण थांबवण्याचे आवाहन !

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या राष्ट्रीय भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) – ‘हर घर तिरंगा’ या धोरणांतर्गत केंद्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचे वाटप प्रत्येक गावागावात पूर्ण करण्यात आले आहे, तर काही गावांमध्ये राष्ट्रध्वज उशिरा उपलब्ध झाल्याने अद्यापही वाटप चालू आहे. शासनाचे हे धोरण जरी कौतुकास्पद असले, तरीही ज्या ठेकेदाराच्या माध्यमातून तिरंग्याचे वितरण केले जात आहे त्याच्याकडून निष्काळजीपणा झाल्याने वितरण केलेल्या राष्ट्रध्वजांत अनेक त्रुटी आढळून येत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन मळगाव गावचे जागरूक नागरिक तथा धर्माभिमानी ग्रामस्थ गजानन सातार्डेकर यांनी सामाजिक माध्यमांतून (व्हॉट्सॲप आणि फेसबूक) अशा राष्ट्रध्वजांचे वितरण थांबवावे, ग्रामस्थांनी अशा राष्ट्रध्वजांचा स्वीकार करू नये, असे आवाहन केले आहे.

श्री. गजानन सातार्डेकर

धर्माभिमानी गजानन सातार्डेकर यांनी आवाहनात तिरंग्याचे कापड जीर्ण असणे, वेडेवाकडे कापलेले असणे, काही तिरंग्यांवर इतर रंगाचे डाग असणे, अशोक चक्र मध्यभागी नसणे, असे आढळून येत असल्याने लोकांनी असे तिरंगे स्वीकारू नयेत, असे सूचित केले आहे. आवाहनात ते पुढे म्हणतात, ‘‘राष्ट्रध्वज हा आपला राष्ट्राभिमान जागवण्याचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याची निर्मिती ही नियमांना धरूनच असली पाहिजे होती; परंतु संबंधित ठेकेदाराने राष्ट्रध्वजाचा कोणताही आदर न बाळगता केवळ उत्पन्नवाढीचे साधन म्हणून मिळेल तसे नगास नग देऊन पैसे उकळण्याचे काम केले आहे. राष्ट्रध्वज पाहिल्यास ते बनवण्याचा ठेका पाकिस्तानात दिला होता कि काय ? असा प्रश्न पडतो. लोकानी निश्चिती करूनच राष्ट्रध्वज स्वीकारावा आणि सन्मानपूर्वक आपल्या घरी फडकवावा.’’