भारत रशियाकडून ‘बाँबर’ विमाने खरेदी करणार !

(बाँबर विमाने म्हणजे बाँब गतीने फेकणारी लढाऊ विमाने)

जगातील सर्वांत घातक बाँबर विमान ‘टीयू-१६०’

नवी देहली – भारत रशियाकडून जगातील सर्वांत घातक बाँबर विमान ‘टीयू-१६०’ खरेदी करणार आहे. रशियाकडून किमान ६ ‘टीयू-१६०’ बाँबर विमाने खरेदी करण्यासाठी दोन्ही देशांमधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे वृत्त समोर आले आहे. ही जगातील सर्वांत वेगवान, सर्वांत मोठी आणि घातक बाँबर विमाने आहेत.

आतापर्यंत जगात केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या ३ देशांकडे बाँबर विमाने होती. भारताने ती विकत घेतल्यास तो अशी विमाने असणारा जगातील चौथा देश ठरेल. ही बाँबर विमाने ध्वनीच्या दुप्पट वेगाने उडतात. ती अतीवेगाने शत्रू देशाच्या सीमेत घुसून बाँब टाकू शकतात. ‘कुठेही आणि केव्हाही आक्रमण करणे’, हे या विमानांचे वैशिष्ट्य आहे. शत्रूदेशाच्या ‘रडार’च्या (रेडिओ लहरींद्वारे विमाने किंवा जहाजे यांचा शोध घेण्यार्‍या यंत्रणेच्या) टप्प्यात ही विमाने येत नाहीत. ही विमाने अनुमाने ४० सहस्र किलो वजनाचे बाँबही वाहून नेऊ शकतात.

संपादकीय भूमिका

भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या मिग विमानांचा अपघात होण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. या विमानांचा दर्जा पहाता रशियाकडून युद्धसाहित्य खरेदी करतांना भारताने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच युद्धसाहित्य निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने ‘आत्मनिर्भर’ होणेही आवश्यक आहे !