सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर सनातनच्या १२१ व्या आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

दुर्धर आजारपणात ‘नामची तारी भवसागरी’ या उक्तीप्रमाणे जीवन जगून ‘सनातनचे १२१ वे संतपद’ प्राप्त करणार्‍या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (मृत्यूसमयी वय ६६ वर्षे) !

पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर

‘मूळ ठाणे येथील दांपत्य अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर २७ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात आले अन् त्यांनी साधनेला आरंभ केला. वर्ष २००८ मध्ये ते दोघेही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनेसाठी आले.

वर्ष २०१६ मध्ये सौ. प्रमिला केसरकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. पुढे त्यांचा आजार वाढतच गेला आणि त्याचबरोबर त्यांची आंतरिक साधनाही वाढू लागली. साधना आणि देवावरील दृढ श्रद्धा यांमुळे सौ. केसरकर यांनी दुर्धर आजारपणाला धैर्याने तोंड दिले. यातून त्यांच्यातील अफाट सहनशीलतेचे दर्शन होते.

अधिवक्ता रामदास केसरकर यांनी पत्नीच्या आजारपणात त्यांची मनापासून सेवा केली. ते पत्नीच्या आजारपणाला स्थिरतेने सामोरे गेले. अधिवक्ता रामदास केसरकर यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून त्यांची पुढील प्रगतीही जलद होत आहे.

साधनेची तीव्र तळमळ आणि चिकाटी या गुणांमुळे कर्करोगासारख्या आजारपणातही सौ. केसरकर यांनी वर्ष २०१७ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. १८.१०.२०२१ या दिवशी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. त्या वेळेस त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. मृत्यूनंतर त्यांच्या देहातून चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यांच्या आंतरिक साधनेमुळे निधनानंतरही त्यांची आध्यात्मिक प्रगती झपाट्याने होत गेली.

असाध्य आजारपणात ‘नामची तारी भवसागरी’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या उक्तीप्रमाणे जीवन जगलेल्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘व्यष्टी संत ’ म्हणून ‘सनातनचे १२१ वे संतपद’ प्राप्त केले आहे. ‘कर्करोगासारख्या दुर्धर आजारपणात पू. (कै.) सौ. प्रमिला केसरकर यांनी चिकाटीने साधना करून अवघ्या ५ वर्षांतच संतपद प्राप्त करणे’, ही एक अद्वितीय गोष्ट आहे.

पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.८.२०२२)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी (कै.) सौ. प्रमिला केसरकर संत झाल्याचे सांगणे

अधिवक्ता रामदास केसरकर

‘१८.१०.२०२१ या दिवशी रात्री १०.३० वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सौ. प्रमिला केसरकर यांचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले. निधनाच्या दिवशी त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कै. (सौ.) प्रमिला यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे आध्यात्मिक स्तरावर निरीक्षण केले. या निरीक्षणात ‘पार्थिवावर त्यांनी केलेले विविध प्रयोग, त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे, त्यामागील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले शास्त्र आणि साधकांना आलेल्या अनुभूती’ हे लिखाण २४.१०.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या लिखाणाच्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची मृत्यूनंतर ५ मासांनी ७० टक्के आध्यात्मिक पातळी होऊन त्या संत होतील’, अशी चौकट प्रसिद्ध झाली होती. ४.६.२०२२ या दिवशी या चौकटीच्या संदर्भात जिज्ञासा म्हणून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘गुरुदेव, कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांची पातळी वाढून आता त्या संत झाल्या का ?’’ त्यावर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘थांबा हं. पाहून सांगतो !’’ (सूक्ष्मातून पाहून) गुरुदेवांनी सांगितले, ‘‘हो. त्या संत झाल्या आहेत.’’ – अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार (४.६.२०२२)


निरपेक्ष प्रीती, उत्कट भक्तीभाव आणि गंभीर आजारपणातही सतत कृतज्ञताभावात राहून ‘सनातनचे १२२ वे संतपद’ प्राप्त करणार्‍या कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे (मृत्यूसमयी वय ७४ वर्षे) !

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे

‘वर्ष १९९३ मध्ये गोव्यात झालेल्या एका साधनाविषयक अभ्यासवर्गात माझी सनातनच्या २१ व्या संत पू. (कै.) श्रीमती सीताबाई मराठे, त्यांचा मुलगा श्री. प्रकाश मराठे आणि सूनबाई सौ. शालिनी मराठे यांच्याशी पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांनी साधनेला आरंभ केला. पुढे वर्ष २००८ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री. प्रकाश मराठे आणि सौ. शालिनी मराठे दांपत्य साधनेसाठी आले. कौतुकाची गोष्ट म्हणजे उतारवयातही ते आश्रमजीवनाशी लगेच एकरूप झाले. दोघांनी सहजता आणि प्रेमभाव या गुणांमुळे आश्रमातील साधकांना आपलेसे केले.

सौ. शालिनी मराठे म्हणजे भोळ्या आणि उत्कट भावाचे मूर्तीमंत उदाहरण ! त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यांतून आणि लिखाणातून साधकांना त्यांच्यात असलेल्या भावाची प्रचीती येत असे. त्यांच्या लिखाणाची एक विशिष्ट आणि भावपूर्ण शैली होती. ‘हृदयस्पर्शी आणि भावभक्तीने ओथंबलेले लिखाण’, ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये होती.

निर्मळता, प्रांजळपणा आणि साधनेची तळमळ यांमुळे सौ. शालिनी मराठे यांनी वर्ष २०१६ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. मार्च २०२२ मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. या आजाराला त्या अत्यंत धैर्याने सामोर्‍या गेल्या. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गंभीर शारीरिक स्थितीतही त्या सतत इतरांचा विचार करायच्या. त्यांच्या चेहर्‍यावर, तसेच त्यांच्या बोलण्यातून सर्वांना आनंद आणि कृतज्ञताभाव जाणवायचा. नंतरच्या काळात सौ. शालिनी मराठे यांचे आजारपण आणखी गंभीर होत गेले आणि त्यांचे १६.७.२०२२ या दिवशी कर्करोगाने निधन झाले. त्या वेळेस त्यांची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के होती.

सौ. शालिनी मराठे यांचे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७८ वर्षे) पत्नीच्या आजारपणात आणि देहावसानानंतर अतिशय स्थिर अन् शांत होते. यातून ‘त्यांची संतत्वाकडे जलद गतीने वाटचाल चालू आहे’, हे लक्षात येते.

सौ. शालिनी मराठे यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेतांना अनेक साधकांना ‘त्या संत झाल्या आहेत’, असे जाणवले. कर्करोगासारखे गंभीर आजारपण स्थिरतेने स्वीकारणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे अन् ‘व्यष्टी संत’ म्हणून त्यांनी ‘सनातनचे १२२ वे संतपद’ प्राप्त केले आहे. मृत्यूनंतर एवढ्या गतीने, म्हणजे अवघ्या २९ दिवसांत त्यांची पातळी ४ टक्क्यांनी वाढली आहे. एवढ्या जलद गतीने आध्यात्मिक उन्नती केल्याचे सनातनच्या इतिहासातील हे एक अद्भुत उदाहरण आहे.

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.८.२०२२)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘सौ. मराठेकाकू संतपदाच्या दिशेने वाटचाल करत आहेत’, असे सांगणे

श्री. प्रकाश मराठे

सौ. शालिनी मराठे यांच्या देहावसानानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘देहावसान होण्याच्या अगोदरच काकू सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन घेऊन गेल्या. त्यांच्याकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे. त्या संतपदाच्या दिशेने वाटचाल करत पुढे निघाल्या आहेत. आता तुम्ही ‘निर्विचार’ हा जप करा.’’ त्या मधे मधे मला धीर देत होत्या. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी, म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिल्याने कै. (सौ.) शालिनी यांचे जीवन कृतार्थ झाले. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – श्री. प्रकाश मराठे (सौ. शालिनी मराठे यांचे पती), रामनाथी, गोवा. (२१.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक