‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !
कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचे १८.१०.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कर्करोगाने देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ वर्षे होते. सौ. केसरकर यांनी साधना समजल्यापासूनच जलद प्रगतीसाठी कठोर प्रयत्न करण्याचा निर्धार केला. त्यांनी अध्यात्मशास्त्राच्या तात्त्विक भागाचा अभ्यास करून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी तळमळीने प्रयत्न केले. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून प्रगती करण्याचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे पती अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.
१. विवाहापूर्वीचे जीवन
१ अ. सुसंस्कारित कुटुंबात जन्म होणे आणि चाकरी करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे : ‘माझी पत्नी सौ. प्रमिला केसरकर यांचा जन्म सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग (तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा) येथे एका गरीब; परंतु सुसंस्कारित कुटुंबात झाला. त्यांचे वडील (कै. वसंत विष्णु मोंडकर) प्राथमिक शिक्षक होते. सौ. प्रमिला यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ असल्याने त्यांनी सावंतवाडी येथील टपाल खात्यात (पोस्ट ऑफिसमध्ये) नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
२. विवाहानंतर
२ अ. विवाहानंतर सासरच्या एकत्र कुटुंबात रहातांना त्रास सहन करून सर्वांशी जुळवून घेणे : वर्ष १९८१ मध्ये आमचा विवाह झाल्यानंतर सौ. प्रमिला ठाणे शहरात सासरी रहायला आल्या. आमचे एकत्र कुटुंब होते. आमच्या एकत्र कुटुंबात एकूण १० सदस्य होते. त्यामुळे मी माझ्या मालकीची स्वतंत्र सदनिका घेईपर्यंत आमच्या घरी त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. तो त्यांनी शांतपणे सहन केला. त्याबद्दल त्यांनी माझ्याकडे कधीही गार्हाणे केले नाही. त्यांनी माझे आई-वडील (आई कै. (सौ.) यमुनाबाई धोंडू केसरकर, वडील कै. धोंडू अर्जुन केसरकर), बहिणी (सौ. शारदा अजित कुर्ले (वय ६० वर्षे), सौ. शशिकला दीपक जामसंडेकर (वय ५५ वर्षे), सौ. जयश्री दीपक कोयंडे (वय ५३ वर्षे), आणि भाऊ (श्री. अशोक धोंडू केसरकर (वय ७१ वर्षे), कै. विश्वनाथ धोंडू केसरकर, कै. जयप्रकाश धोंडू केसरकर) (सर्वजण रहाणार ठाणे) या सर्वांशी जुळवून घेतले.
२ आ. नोकरी सांभाळून एकटीने घराचे दायित्व घेऊन मुलींना सांभाळणे : आम्ही साधनेत येण्याआधी कुणाचेही साहाय्य नसतांना सौ. केसरकर यांनी आमचा संसार चांगल्या प्रकारे केला. मी माझ्या वकिली व्यवसायात व्यस्त असल्याने रविवार सोडून अन्य दिवशी मला घरच्या कामांसाठी वेळ देता येत नसे. त्यांनी हे समजून घेऊन स्वतःची नोकरी सांभाळून ‘जेवण करणे, घराची स्वच्छता इत्यादी घरातील सर्व कामे, तसेच दोन्ही मुलींचे (मोठी मुलगी – सौ. साक्षी समीर नाईक (वय ३८ वर्षे), फोंडा (पूर्वाश्रमीची नीलम रामदास केसरकर) आणि धाकटी मुलगी कु. उमा रामदास केसरकर (वय ३३ वर्षे), ठाणे) यांचे शिक्षण आणि अभ्यास घेणे’, असा संसाराचा भार देवाच्या कृपेने समर्थपणे सांभाळला.
२ इ. मुलीला होणार्या आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी नामजप आणि अनेक विधी करणे : आमची मोठी मुलगी (सौ. साक्षी समीर नाईक) जन्मल्यापासून ६ वर्षांपर्यंत सतत आजारी पडत असे. तिच्या आजारपणात सौ. केसरकर यांनी कित्येक रात्री जागून काढल्या. त्या वेळी आम्हा उभयतांना साधना आणि साधनेचे आपल्या जीवनातील महत्त्व ठाऊक नव्हते. वर्ष १९९४ मध्ये गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आम्ही साधनेत आल्यानंतर आम्हाला कळले की, मोठ्या मुलीचा त्रास आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. त्यासाठी आम्ही संतांनी वेळोवेळी सांगितलेले नामजपादी उपाय आणि अनेक आध्यात्मिक विधी केले.
(क्रमश:)
– अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२२)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/605149.html