पावित्र्याचे प्रतीक असलेले श्रीफळ, म्हणजेच नारळ !
१. नारळ मिळण्याची स्थाने
‘नारळ हे उष्ण कटिबंधात होणारे फळ आहे. हिंदी आणि पॅसिफिक महासागर ही नारळ मिळण्याची मूळ स्थाने आहेत. नारळाला ‘दक्षिणेकडील फळ’, असे समजले जाते. नंतर त्याचा प्रसार इतरत्र होऊ लागला.
२. नारळाला आवश्यक भूमी
नारळाला मऊ आणि भुसभुशीत भूमी अधिक मानवते; म्हणून नारळ समुद्रकिनारी अधिक येतात. अशा मातीला ‘गझनी’, असे म्हणतात.
३. नारळाच्या झाडांना फळे येण्यास लागणारा अवधी
गझनीत लावलेल्या नारळाला ५ वर्षांनी फळे येण्यास आरंभ होतो. नारळाच्या झाडाला २० – २५ वर्षे फळे येतात. नंतर त्याचे उत्पादन अल्प होत जाते. भूमी गझनी नसेल, तर ८ – ९ वर्षांनी नारळाला फळे येतात. ६० ते ९० फूट उंचच्या उंच अशा नारळाच्या झाडाला ‘माड’, असे म्हणतात आणि त्यांच्या फळांना ‘श्रीफळ’ म्हणतात. ‘श्रीफळ’ पावित्र्याचे प्रतीक मानले जाते.
४. नारळाच्या झाडाला फळ येण्याची प्रक्रिया
काही नारळाच्या झाडांना ८० वर्षांपर्यंतही फळे येतात. नारळाच्या रोपाचे खोड भूमीत ३ – ३.५ फूट खोल गेलेले असते. त्याच्या पानांची लांबी १५ ते २० फूट असते. नारळाला बाराही मास फुले येतात. नारळाचे झाड फुलण्याच्या अवस्थेत आले की, प्रत्येक मासाला एक नवी ‘पोय’ येते आणि त्यावर ‘पुसुंण’ नावाच्या जाळीसारखे आवरण निर्माण होते. २ आठवड्यांनी ते आवरण आपोआप उघडले जाते आणि त्यातून फुलाचा गुच्छ बाहेर येतो. त्यात २० फुले असतात. त्यातील कित्येक फुले गळून जातात आणि राहिलेल्या फुलांचे फळांत रूपांतर होण्यास आरंभ होतो. झाडाला वर्षांतून १० ते १२ गुच्छ येतात.
५. नारळाच्या जाती
नारळाच्या झाडाचे २ प्रकार असतात. एक मोहाचा नारळ आणि दुसरा साधा नारळ. नारळाच्या या जातीविना बुटक्या नारळाचीही एक जात असते. या झाडाला २ – ३ वर्षांतच फळे यायला आरंभ होतो. दक्षिण भारतात केरळ, कोकण, गुजरात, मुंबई, पूर्व किनारा इत्यादी ठिकाणी पुष्कळ नारळ येतात. जगामध्ये जेवढा नारळ वापरला जातो, त्याच्या तिसर्या भागाएवढे नारळ एकट्या फिलीपाईन्समध्ये होतात.
६. नारळाचे उपयोग
अ. मनुष्याला धष्टपुष्ट बनवण्यासाठी खोबरे अत्यंत प्रभावशाली फळ आहे. ओल्या कोवळ्या नारळाला ‘शहाळे’ असे म्हणतात. मुंबई चौपाटी किंवा इतर कुठल्याही चौपाटीला गेले की, लोक पाण्यापेक्षा नारळपाणी आणि कोवळे खोबरे खातात.
आ. नारळाचे तेल म्हणजेच खोबरेल तेल. आपण फार पूर्वीपासून खोबरेल तेल वापरतो. श्रीलंका, मलबार, कोकण येथील लोक खोबरेल तेलाचा वापर तूप म्हणून करतात.
इ. महाराष्ट्र आणि गुजरात येथे खोबरेल तेलाचा वापर केवळ डोक्याला लावण्यासाठी करतात. जर्मन आणि फ्रान्समध्येही नारळ अन् खोबरेल तेल यांचा वापर होतो.
ई. नारळाच्या झाडातून निघणार्या रसाला ‘निरा’, असे म्हणतात. हे अतिशय लज्जतदार पेय आहे. नारळाचे पाणी, खोबरे, खोबर्याचा चोथा, नारळाच्या झावळ्या इत्यादींचे अनेक उपयोग आहेत.
७. नारळाचे औषधी उपयोग
७ अ. शरीर धष्टपुष्ट बनते ! : मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे ३ मास सकाळी खोबरे अन् गूळ चावून खाल्ल्याने कृश शरिराच्या तरुण मुलांच्या हाडांची वाढ होते. छाती भरदार होते, शरीर धष्टपुष्ट बनते आणि शरिरात चरबी वाढते.
७ आ. पोटातील जंत मरतात ! : नारळाचा दोन इंच तुकडा सायंकाळी चावून-चावून खावा. २ घंट्याने रात्रीच्या जेवणात हिंग भातात कालवून खावा आणि दुसर्या दिवशी प्रतिदिनच्या सवयीप्रमाणे शौचाला जाऊन आले की, कोमट पाण्याचा एनिमा (बस्ती) घ्यावा. सर्व प्रकारचे जंत शरिराबाहेर येतात. सर्व जंतांना ओले खोबरे आवडते, ते खाण्यासाठी ते गोळा होतात. भाताच्या समवेत हिंग खाल्ल्याने जंत मरतात आणि दुसर्या दिवशी मृत जंत एनिमावाटे बाहेर टाकले जातात.
७ इ. हृदयरोगावर उपयुक्त : ओल्या नारळाचे पाणी न घालता काढलेले दूध पाच तोळे (५० ग्रॅम) घेऊन त्यात भाजलेले हळकुंड उगाळावे आणि नंतर २० ग्रॅम तूप घालून प्यायल्याने हृदयरोग बरा होतो.
७ ई. नारळाच्या पाण्यात गूळ आणि धणे घालून प्यायल्याने दाहयुक्त मूत्रकृच्छ दूर होतो.
७ उ. खोबरे खाल्ल्याने आणि शरिरावर चोळल्याने दाह अन् खाज अल्प होते.
७ ऊ. वातविकार उपयुक्त : एक नारळ चांगला खवून घ्यावा आणि तो दीडपट पाण्यात टाकावा. त्यात दोन बिब्बे बारीक करून टाकावे आणि ते मिश्रण चांगले उकळावे. त्यात तेल आणि आले टाकावे. चोथा खाली बसला की, वरवरचे तेल काढावे. त्या तेलाने वातविकार असलेल्या माणसाच्या शरिराला मर्दन करावे आणि खाली राहिलेला चोथा त्यांना खाऊ घालावा.
७ ए. खोबरेल तेल थंड, मधुर, जड, पित्तनाशक, केशवर्धक असते. डोक्याला लावल्यास केस मुलायम आणि चमकदार बनतात.
७ ऐ. या तेलाने व्रण (जखम) लवकर भरून येते आणि दाह दूर होतो.
७ ओ. शरिराला मसाज करण्यासाठी : यासाठी खोबरेल तेल उत्तम असते. ते थंडीत गोठून गेल्याने प्रवाही नसते. तेल सांधेदुखीसाठी वापरायचे असल्यास तुळस टाकून भरपूर उकळावे आणि नंतर वापरावे.
७ औ. उंदीर चावल्यावर लावायचे औषध : खोबरेल तेल अधिक दिवस राहिल्यास खवट बनते. खवट खोबरे मुळ्याच्या रसात उगाळून उंदीर चावलेल्या ठिकाणी लावल्यास त्याचा लाभ होतो.
७ अं. नारळात असणारी जीवनसत्वे : नारळात ‘लाईसिन’, ‘ट्रिप्टोफीन’, ‘अमोयनो ॲसिड’ विपुल प्रमाणात असतात. शिळ्या ओल्या नारळात उष्मांक (कॅलरीज) भरपूर असतात. त्यात सर्व आरोग्यदायक घटक आणि जीवनसत्त्वे असतात.’
– डॉ. रविराज (साभार : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, दिवाळी विशेषांक २०१४)