चीन, जपान आणि तैवान यांच्यातील शत्रुत्व अन् राष्ट्रहित जोपासणारी भारताची भूमिका !
१. चीनने तैवानवर सोडलेल्या ११ क्षेपणास्त्रांपैकी ५ क्षेपणास्त्रे जपानच्या सीमेत पडणे आणि त्यामागील कारणमीमांसा !
‘अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये गेल्यानंतर चीनने स्वतःचा रोष दाखवण्यास प्रारंभ केला आहे. चीनने तैवानच्या विरोधात अनेक कारवाया चालू केल्या आहेत. त्याने तैवानला सर्व बाजूंनी वेढलेले आहे. बाहेरून येणार्या व्यापारी जहाजांनाही तेथे रोखून धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांपूर्वी चीनने तैवानवर ११ क्षेपणास्त्रे सोडली. त्यातील ५ क्षेपणास्त्रे जपानच्या समुद्रात पडली. नेम धरला होता खरा तैवानवर; पण ती पडली जपानमध्ये ! येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, नॅन्सी पेलोसी तैवानचा दौरा आटोपून दक्षिण कोरियामध्ये गेल्या आणि तेथून त्या जपानमध्ये पोचल्या होत्या. त्यामुळे जपानला चेतावणी देण्यासाठीही चीनने अशी आगळीक केली असण्याची शक्यता आहे.
यात दोन गोष्टी घडू शकतात. एकतर ते क्षेपणास्त्र चुकीमुळे पोचले असेल किंवा ते जपानजवळ मुद्दामहून पाडण्यात आले असावे. चिनी शस्त्रांची निश्चिती देता येत नाही. त्यांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधाही कमकुवत असतात. त्यांच्या उत्पादनांचा दर्जा अतिशय खालचा असतो, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. ‘अनेक वेळा चिनी लोकही ‘मेड इन चायना’च्या वस्तू वापरत नाहीत’, असे म्हटले जाते. ते बाहेरच्या वस्तूंना प्राधान्य देतात.
२. जपान चीनचा शत्रू असल्यामुळे चीनने त्याला चेतावणी देण्यासाठी क्षेपणास्त्रे सोडण्याची शक्यता असणे
पेलोसी जपानमध्ये पोचल्यावर तेथे क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यामुळे ‘चीनने हे जाणीवपूर्वक केले असावे’, असे नाकारता येत नाही. जपान हाही चीनचा शत्रू आहे आणि ‘सेनकाकू’ बेटावरून या दोन्ही देशांमध्ये वाद आहे. इतकी वर्षे जपान संरक्षणासाठी पैसा व्यय करण्यास सिद्ध नव्हता; पण चीनच्या भीतीमुळे जपानने स्वतःचे संरक्षण ‘बजेट’ वाढवणे चालू केले आहे. दुसर्या महायुद्धानंतर हे प्रथमच घडत आहे. या प्रसंगामुळे ‘चीन आता जपानच्याही वाट्याला जाईल का ?’, असा प्रश्न निर्माण होतो.
३. चीनने तैवानच्या विरोधात पारंपरिक युद्ध केल्यास त्याला मोठ्या प्रमाणात रक्त सांडवावे लागेल !
चीन पूर्वीपासूनच तैवानच्या कुरापती काढत आला आहे. चीनने तैवानवर सायबर आक्रमण केले आहे. ‘जगातील सर्वांत मोठे सायबर (माहिती-तंत्रज्ञान) आक्रमण चीनने तैवानच्या सरकारी पायाभूत सुविधा आणि ‘नेटवर्क’ यांच्यावर केले आहे’, असे म्हटले जाते; परंतु तैवानची सुरक्षाव्यवस्था मजबूत असल्याने त्याच्यावर याचा विशेष परिणाम झाला नाही. चीन तैवानशी असलेला व्यापारही बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनचीच हानी होणार आहे; कारण तैवानमध्ये बनलेले ‘सेमीकंडक्टर’ (इलेक्ट्रॉनिक उपकरणातील एक सुटा भाग) हे मोठ्या प्रमाणात चीनमध्ये घेतले जातात. सध्या चिनी विमाने तैवानच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना तैवान लगेच प्रत्युत्तर देतो. तैवाननेही त्यांची हवाई सुरक्षा आणि क्षेपणास्त्रे सक्रीय केली आहेत.
तैवानची तिन्ही दले अतिशय सक्षम आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. त्यामुळे लढाई झालीच, तर ज्याप्रमाणे युक्रेनने रशियाला प्रत्युत्तर दिले, त्याप्रमाणे तैवानही चीनला प्रत्युत्तर देऊ शकतो. ‘एखाद्या वेळी चीन तैवानवर समुद्राच्या बाजूने आक्रमण करू शकतो’, हे लक्षात घेऊन तैवानने समुद्रकिनार्यावरील सुरक्षा मजबूत ठेवली आहे. त्यामुळे चीनने पारंपरिक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तेथे पुष्कळ रक्त सांडवावे लागेल.
४. चिनी सैन्याकडे पारंपरिक युद्ध करण्याचे धाडस नसल्याने चीन केवळ ‘हायब्रिड वॉर’ (एकही गोळी न चालवता केलेले युद्ध) चालू ठेवण्याची शक्यता असणे
‘अमेरिका तैवानला साहाय्य करील का ?’, असा प्रश्न निर्माण होतो. अमेरिकी सैन्याने युक्रेनच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही; पण शस्त्रास्त्रांचे साहाय्य केले. आजची परिस्थिती अशी आहे की, अमेरिकेचे ‘एअरक्राफ्ट कॅरियर’ (विमानवाहू नौका) हे दक्षिण चिनी समुद्रात आलेले आहेत. त्यामुळे आवश्यकता भासली, तर अमेरिका हवाई दल आणि नौदल यांचे साहाय्य तैवानला देऊ शकतो. ‘ते साहाय्य देण्याची इच्छाशक्ती अमेरिकेचे नेतृत्व दाखवेल का ?’, हा खरा प्रश्न आहे. चीन दमदाटी करून अमेरिकेला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. मध्यंतरी चीनने अमेरिकेला धमकी दिली होती की, नॅन्सी पेलोसी यांना तैवानमध्ये पाठवू नका. त्यांना पाठवले, तर आम्ही त्यांचे विमान पाडू. नंतर ‘पेलोसी तैवानमध्ये आल्या, तर त्यांना बाहेर जाऊ देणार नाही’, अशी धमकीही दिली होती. प्रत्यक्षात पेलोसी यांचा दौरा आटोपला; पण चीन त्यांचे काहीही वाकडे करू शकला नाही. चीन पारंपरिक युद्ध करण्याची शक्यता पुष्कळ अल्प दिसते; परंतु त्याचे अपारंपरिक युद्ध, म्हणजे ‘हायब्रिड वॉर’ (अपप्रचार युद्ध, सायबर वॉर, आर्थिक युद्ध इत्यादी) हे चालू रहाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा तो प्रयत्न करील. चीन कदाचित् अमेरिकेच्या विरोधातही व्यापार युद्ध चालू करील. सध्या चिनी सैन्याकडे पारंपरिक युद्ध करण्याचे धाडस नाही.
५. भारताने तैवानशी आर्थिक संबंध चालू ठेवून राष्ट्रीय हित जोपासणे आवश्यक !
तैवानचे भारताशी राजकीय संबंध नाहीत. त्यामुळे त्या देशात भारताचा दूतावास नाही. असे असले, तरी भारताचा तैवानशी असलेला व्यापार वेगाने वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या संदर्भातही तैवान आणि भारत यांचे नाते चांगले आहे. तैवान भारतात परकीय गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात करत आहे. भारताला वेगाने प्रगती करायची असेल, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. अमेरिका भारताला देत असलेले तंत्रज्ञान महागडे आहे. इस्रायलही भारताला व्यावसायिक स्तरावर तंत्रज्ञान पुरवतो. त्या तुलनेत तैवान भारताला थोडे अल्प किमतीत तंत्रज्ञान पुरवतो. या पार्श्वभूमीवर भारताने तैवानशी आर्थिक संबंध गुप्तपणे वाढवावेत; परंतु पारंपरिक युद्ध करण्याची आवश्यकता नाही. दूरचित्रवाहिनीवर आरडाओरडा करून चीनला शिव्या देण्याचीही आवश्यकता नाही. भारताला जे करायचे आहे, ते चालू ठेवून शांतपणे राष्ट्रीय हित जोपासावे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे