जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत एकमुखाने संमती
जळगाव – मंदिरे ही सात्त्विकता आणि चैतन्य मिळवण्याची क्षेत्र आहेत. तेथे योग्य पेहराव करून गेल्यास भाविकाला निश्चितच त्या मंदिरातील चैतन्य मोठ्या प्रमाणात ग्रहण करता येते. त्यामुळे भाविकांनाच त्याचा लाभ होतो. यामुळे यापुढे भाविकांचा विचार करून मंदिरात वस्त्रसंहिता लागू करूया, असा ठराव अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह देवस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत एकमुखाने संमत करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मंदिर संस्कृती जतन आणि संवर्धन’ या विषयावर मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी यांच्या एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते.
मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव
आज देशात अनेक आस्थापने अशी आहेत, जेथे वस्त्रसंहिता लागू आहे आणि त्याचे पालनही समाज करत आहे. मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्याने भाविकांनाच त्याचा लाभ होईल. मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनणे आवश्यक आहे.
मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन आवश्यक ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे, मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण होणे, मंदिरांचे पावित्र्य भंग करणे, मंदिरांतील दानपेट्या फोडणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.
आरंभी सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री मंगळग्रह देवस्थानचे सहसचिव श्री. बहिरम, श्री पद्मालय गणेश मंदिराचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी मंदिरांवर होत असलेल्या विविध आघातांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या बैठकीला प्रामुख्याने मंगळग्रह देवस्थान, एरंडोल येथील श्री पद्मालय गणेश मंदिर, पारोळा येथील श्री बालाजी मंदिर आणि श्रीराम मंदिर, धुळे येथील शक्तीपीठ श्री एकविरादेवी मंदिर, अमळनेर येथील श्री कपिलेश्वर मंदिर, श्री वर्णेश्वर महादेव मंदिर, जळगाव येथील श्री शनी मंदिर आणि श्री दत्त मंदिर, बोरनारे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आदी मंदिरांचे विश्वस्त, तसेच पुजारी उपस्थित होते. या बैठकीची सर्व व्यवस्था ‘श्री मंगळग्रह मंदिर संस्थान’ने पाहिली.
बैठकीत संमत झालेले ठराव
१. शासनाकडे राज्यातील सर्व मठ, मंदिरे, देवस्थाने सरकारमुक्त करून ती भक्तांकडे सोपवण्याची मागणी करणे
२. मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे
३. मंदिराच्या ५०० मीटर परिसरात मांस आणि मद्य विक्रीची दुकाने नसण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे
४. प्रत्येक २ मासांनी मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करून त्यातून पुढील कृतींचे नियोजन करणे