गोव्यात पंचायत निवडणुकीत ७८.७० टक्के मतदान
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील १९१ पैकी १८६ पंचायतींसाठी १० ऑगस्ट या दिवशी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. राज्यात एकूण ७८.७० टक्के मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. नवीन मतदारांसह ज्येष्ठ मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा अधिकार बजावला. १ सहस्र ४६४ प्रभागांसाठी ५ सहस्र ३८ उमेदवार निवडणुकीत उभे होते. १२ ऑगस्टला सकाळी ८ वाजता राज्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
खोब्रावाडा, कळंगुट येथे प्रभाग क्रमांक ९ व्यतिरिक्त अन्यत्र सर्व ठिकाणी सुरळीत मतदान झाले. सकाळी ८ वाजता मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या २ घंट्यांत १९ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत ४० टक्के, दुपारी ४ वाजेपर्यंत ७० टक्के आणि शेवटी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७८.७० टक्के मतदान झाले. पंचायतींमध्ये नवीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.
खोब्रावाडा, कळंगुट येथे फेरमतदान
खोब्रावाडा, कळंगुट येथे प्रभाग ९ मध्ये मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर मतदारांना मतपत्रिकांवर उमेदवाराच्या नावासमोर चुकीची निशाणी (निवडणूक चिन्ह) छापल्याचे लक्षात आले. यामुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार संबंधित यंत्रणेच्या नजरेस आणून देईपर्यंत सुमारे १६ जणांनी मतदान केले होते. निवडणूक अधिकार्याने घटनेची नोंद घेऊन मतदान थांबवले. राज्य निवडणूक आयोगाने या प्रभागाची निवडणूक स्थगित केली आहे आणि ही निवडणूक ११ ऑगस्ट या दिवशी होण्याची शक्यता आहे.
क्षणचित्रे
१. केळशी पंचायतीमध्ये १०० वर्षीय महिला डुमेंतीना सौझा यांनी मतदान केले.
२. वेर्णा येथे एका मतदान केंद्रावर सेवा बजावत असतांना पोलीस हवालदार बाबूसो पालकर (वय ४३ वर्षे) यांचा मृत्यू झाला. पोलीस हवालदार बाबूसो पालकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले.
३. शिर तार, शिरोडा येथे मतदान करून परतत असतांना एका जोडप्याच्या वाहनावर मोठे वडाचे झाड कोसळले. या अपघातात पती-पत्नी गंभरीरित्या घायाळ झाले. जोडप्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
४. काही ठिकाणी मतदान केंद्रावरील उतरंड (रँप) पावसामुळे निसरडी झाली होती. त्यावरून जातांना मतदार घसरून पडल्याच्या घटना घडल्या. ज्येष्ठ मतदारांना उतरंडीवरून जातांना कसरत करावी लागली.
५. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणी ९ ऑगस्टच्या रात्री उशिरा उसगाव पंचायतीमधील प्रभाग क्रमांक ४ मध्ये तुळशीदास गाड आणि अच्युत पांडुरंग उसगावकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. पैसे वाटपाच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.