वारकरी संप्रदायाने केलेला सत्कार म्हणजे साक्षात् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
पुणे – ‘वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला सत्कार म्हणजे साक्षात् ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला आहे’, या शब्दांमध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना तीर्थक्षेत्र आळंदी येथील ‘संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती’ आणि समस्त वारकरी संप्रदाय यांच्या वतीने माऊलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त डिसेंबर २०२२ मध्ये दर्शनासाठी आळंदीमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये सदिच्छा भेट घेतली, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते.