‘सर्वनामांचे प्रकार’ आणि त्यांचा भाषेतील वापर !
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘प्राचीन काळी आर्यावर्ताची मातृभाषा आणि ज्ञानभाषा असलेल्या संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी संस्कृतोद्भव भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण सर्वनामांचे ‘पुरुषवाचक सर्वनामे’ आणि ‘दर्शक सर्वनामे’ हे दोन प्रकार पाहिले. आजच्या लेखात त्यापुढील प्रकार पाहू.
(लेखांक १० – भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/602251.html
३ इ. संबंधी सर्वनामे : ‘जो नियमित व्यायाम करतो, तो निरोगी रहातो’, या वाक्यात ‘जो’ आणि ‘तो’ ही दोन सर्वनामे आली आहेत. ही सर्वनामे एकाच ‘व्यायाम करणार्या’ व्यक्तीला उद्देशून वापरली आहेत. त्यामुळे ‘जो’ या सर्वनामाचा पुढे आलेल्या ‘तो’ या सर्वनामाशी एकरूपत्वाचा संबंध आहे.
दुसरे असे की, ‘तो’ हे ‘दर्शक सर्वनाम’ आहे. जवळची अथवा दूरची गोष्ट दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात, त्याला ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.
अशा प्रकारे ‘वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामाशी एकरूपत्वाचा संबंध असणार्या पहिल्या सर्वनामाला ‘संबंधी सर्वनाम’ असे म्हणतात.’ वरील उदाहरणात ‘जो’ हे संबंधी सर्वनाम आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. जे चकाकते, ते सर्वच सोने नसते.
२. जी मनुष्याला मायेतून मुक्त करते, ती खरी विद्या होय !
३. ज्याला साधना करायचीच आहे, तो ती कुठेही राहून करू शकतो.
वरील वाक्यांमधील ‘जे’, ‘जी’, ‘ज्याला’ ही ‘संबंधी सर्वनामे’ आहेत.
३ ई. प्रश्नार्थक सर्वनामे : ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो, त्या सर्वनामांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’ असे म्हणतात. ‘कोण, कोणी, कोणाला, कुठे, काय इत्यादी’ ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. यांत अट अशी आहे की, प्रश्नार्थक सर्वनामे असलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एखादे नामच असावयास हवे, उदा. ‘तू काय आणले आहेस ?’ या प्रश्नातील ‘काय’ या सर्वनामाचे उत्तर ‘मिठाई, कपडे, खेळणे, वही, लेखणी इत्यादी’ असे एखादे नामच असावयास हवे. सरसकट सर्व प्रश्नार्थक शब्दांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणता येत नाही, उदा. ‘तू काय सांगत होतास ?’, या प्रश्नातील ‘काय’ या शब्दाचे उत्तर पुष्कळ वेगळे आणि लहान-मोठे असू शकते आणि ते नाम नसू शकते. त्यामुळे या वाक्यातील ‘काय’ हा शब्द प्रश्नार्थक सर्वनाम नाही. प्रश्नार्थक सर्वनामे समाविष्ट असलेली काही वाक्ये उदाहरणादाखल पुढे दिली आहेत.
१. हा पुतळा कोणाचा आहे ?
२. छायाचित्रात दिसणारी स्त्री कोण आहे ?
३. तुम्ही कुठे चाललात ?
४. या वस्तू कोणासाठी आणल्या आहेत ?
३ उ. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे : ‘कोणी कोणावर टीका करू नये’, या वाक्यात ‘कोणी’ आणि ‘कोणावर’ ही दोन सर्वनामे आली आहेत; मात्र ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी आलेली नाहीत. ती नेमकी कोणत्या नामांबद्दल आली आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही. अशा सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ किंवा ‘अनिश्चित सर्वनामे’, असे म्हणतात. यांची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. कोणाच्या भावना दुखावणे योग्य नव्हे.
२. कोणाला काही सुचवणे किंवा सांगणे, म्हणजे पाप झाले आहे हल्ली !
३. कोणाचे कोणावाचून अडत नसते.
३ ऊ. आत्मवाचक सर्वनामे : मराठीतील पुढील दोन सर्वनामे ही ‘आत्मवाचक सर्वनामे’ आहेत.
३ ऊ १. स्वतः : भाषेतील ‘स्वतः’ हे सर्वनाम स्वतःविषयी बोलतांना वापरले जाते. त्याचबरोबर आणखी एका प्रकारेही हे सर्वनाम वापरले जाते. ‘अभिजितने स्वतः मला सर्व माहिती दिली’, या वाक्यात ‘स्वतः’ या सर्वनामाच्या आधी ‘अभिजित’ हे नाम आले आहे. या वाक्यातील ‘स्वतः’चा अर्थ ‘अभिजित’ असा आहे. अशा प्रकारे वाक्यात प्रथम एखादे नाम किंवा सर्वनाम आले असेल आणि ते नाम अथवा सर्वनाम याचे त्याच वाक्यात पुढे ‘आत्मवाचक’ रूप लिहावयाचे असेल, तर त्या ठिकाणी ‘स्वतः’ हे सर्वनाम वापरतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. मी स्वतः जाऊन खरे-खोटे पाहून येतो.
आ. तुम्ही स्वतः माझ्या शंकांचे निरसन कराल का ?
इ. आज तो स्वतः होऊन अभ्यासाला बसला आहे.
ई. आजोबा स्वतःच्या प्रकृतीला सांभाळून असतात.
उ. चिराग स्वतः काही करत नाही आणि इतरांना नावे ठेवतो.
३ ऊ २. आपण : एखाद्या आदरणीय व्यक्तीला संबोधतांना लोक ‘आपण’ हे सर्वनाम उच्चारतात, उदा. विशालने विनंती केली, ‘‘पंडितजी, आपण जेवून घ्या.’’ मात्र जेव्हा ‘आपण’ या सर्वनामाचा उपयोग केवळ स्वतःचा उल्लेख करण्यासाठी केला जातो, तेव्हा त्याला ‘आत्मवाचक सर्वनाम’ असे म्हणतात, उदा. रावसाहेब म्हणाले, ‘‘आपण असले नियम पाळत नाही.’’ या वाक्यात रावसाहेबांना ‘आपण’ म्हणजे ‘मी’ असे म्हणावयाचे आहे; पण त्यांनी स्वतःचा उल्लेख ‘आपण’ असा आदरार्थी केला आहे. ‘आपण’ या सर्वनामाप्रमाणेच ‘आपला’, ‘आपली’, ‘आपले’ यांसारखी सर्वनामेही आत्मवाचकच आहेत. आत्मवाचक सर्वनामे असलेली आणखी काही वाक्ये उदाहरणादाखल पुढे दिली आहेत.
अ. तात्यासाहेब म्हणाले, ‘‘आपल्याला शांतता आवडते.’’
आ. अप्पांनी सांगितले, ‘‘कुणी काही म्हणो, आपला बुवा या गोष्टींवर विश्वास आहे.’’
इ. कुलदीप रागावून म्हणाला, ‘‘आपण असली कामे करणार नाही !’’
(समाप्त)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२२)