‘आरे’तील ‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आता झाडे तोडणार नाही ! – आश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालिका
मुंबई – आरेतील ‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आता अतिरिक्त झाडे तोडावी लागणार नाहीत, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी राज्यशासनाने वर्ष २०१६ मध्ये ३० हेक्टर जागा दिली आहे. त्यांपैकी २५ हेक्टर जागेमध्येच काम करण्यात येणार असून ५ हेक्टर जागेमधील झाडे तोडण्यात येणार नाहीत. त्यामुळे आता अतिरिक्त झाडे तोडली जाणार नसल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले.
‘मेट्रो ३’च्या कारशेडचे काम हे भूमीअंतर्गत होणार असून या कामात आलेल्या अडथळ्यांमुळे त्याला विलंब झाला आहे. त्यामुळे या कामाच्या निधीत १० सहस्र २७० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. कारशेडच्या प्रकल्पाचे काम ७५ टक्के झाले असून २३ सहस्र १३६ कोटी रुपयांपैकी २१ सहस्र ८९० कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे. त्यामधील २१ सहस्र ५२० कोटी रुपये निधी खर्च केला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचसमवेत उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता होती, ती पूर्तता १० ऑगस्टच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.