गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी महामंडळांची अथवा स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना झाली पाहिजे !
शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ठाणे, ११ ऑगस्ट (वार्ता.) – भारतातील प्रत्येक राज्याला भूगोल आहे; पण महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्र ही गड-दुर्गांची भूमी आहे. गड-दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभाजी महाराज आणि शूर मावळ्यांच्या शौर्याची मूळ प्रतीके आहेत. प्रदीर्घ काळापासून गड-दुर्गांकडे शासन आणि प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष झाल्याने ते आज अत्यंत दूरवस्थेत आहेत. गड-दुर्गांची केलेली हेळसांड म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यासारखेच आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी महामंडळांची अथवा स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये ३५० पेक्षा जास्त गड आहेत. त्यासाठी अनेक शूरवीरांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. गड आज भग्नावस्थेत जात आहे. कोसळलेले बुरुज, भुईसपाट झालेली तटबंदी, पायर्या, तट, भुयारी मार्ग, टेहळणी बुरुज, दिशादर्शक मार्ग, असे सारे काही नामशेष होत आहे. गडांवरील दरवाजे पडक्या अवस्थेत आहेत. जुन्या विहिरी, जल व्यवस्थापनाची रचना असणारी तळी आणि टाक्या बुजल्या आहेत. गड-दुर्गांवर अनुचित प्रकार, विद्रुपीकरण होणे, वणवे लावले जाणे असे प्रकार घडत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.