जालना येथे ४ स्टील व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाच्या धाडी !
५८ कोटींची रोकड, १६ कोटींचे सोने आणि ३९० कोटींची मालमत्ता जप्त !
जालना – येथील स्टील व्यावसायिकदारांवर केलेल्या कारवाईत प्राप्तीकर विभागाने ५८ कोटी रुपयांची रोकड, १६ कोटी रुपयांचे ३२ किलो सोने, हिरे, भूमी, शेती, बंगले आणि बँकांतील ठेवी मिळून एकूण ३९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या ८ दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे ही कारवाई चालू होती. प्राप्तीकर विभागाने जालना येथील एस्.आर्.जे. स्टील, कालिका स्टील आणि फायनान्सर, विमल राज बोरा आणि प्रदीप बोरा या व्यावसायिकांच्या कारखान्यांवर धाडी घातल्या. यात सुमारे ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोने, हिरे आणि इतर ऐवज यांचा समावेश आहे.
१ ते ८ ऑगस्ट या कालावधीत प्राप्तीकर विभागाचे अधिकारी रात्रंदिवस धाडी घालत होते. त्यात नाशिक विभागाच्या उच्चपदस्थ अधिकार्यांसह राज्यातील पुणे, ठाणे आणि मुंबई येथील ४०० अधिकारी सहभागी होते. हे सर्वजण १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून येथे आले होते; पण त्याची कुणालाही माहिती नव्हती. अधिकार्यांनी विवाहाला जात असल्याचे भासवत स्वतःच्या वाहनांवर वधूच्या नावाचे फलक लावले होते. एकाच वेळी ५ पथकांनी व्यावसायिकदारांच्या ‘फार्महाऊस’वर धाडी घातल्या.
जालना येथील ४ मोठ्या स्टील कारखानदारांनी त्यांच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवले; पण ते पूर्णपणे दप्तरावर न आणता रोखीत व्यवहार केले होते. याद्वारे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा संशय होता.
संपादकीय भूमिकाकोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी करून शासनाला फसवणारे समाजद्रोहीच ! |