गौतमऋषि आणि प.पू. भगवानदास महाराज यांची साधना अन् कठोर तपश्चर्या यांमुळे पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमाची महती
१. गौतमारण्य आश्रम आणि प.पू. भगवानदास महाराज यांची महती ऐकून त्यांच्या दर्शनाकरिता आलेले पहिले संत प.पू. नांदोडकर महाराज आणि दुसरे संत, म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
‘माणगाव येथील संत प.प. टेंब्येस्वामी यांचे शिष्य प.पू. नांदोडकर महाराज हे सर्वांत पहिले संत आहेत, ज्यांनी गौतमारण्य आश्रमाची आणि प.पू. भगवानदास महाराज यांची महती ऐकून आश्रमाला भेट दिली. ते प.पू. भगवानदास महाराज यांच्या दर्शनाकरिता गौतमारण्य आश्रमात आले. त्यानंतरचे दुसरे संत, म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले ज्यांनी वर्ष २००४ मध्ये गौतमारण्य आश्रमात येऊन आम्हाला दर्शन दिले.
२. गौतमारण्य आश्रमात गौतमऋषि आणि प.पू. भगवानदास महाराज यांनी केलेली साधना अन् त्यांच्या चैतन्यामुळे पवित्र झालेला आश्रमातील झरा !
२ अ. एक मोठे तपस्वी संत बांदा येथे असल्याचे समजल्यावर प.पू. नांदोडकर महाराज यांनी त्यांच्या आश्रमात गाय आणि वासरू अर्पण करण्यासाठी ते भक्तांसमवेत देऊन बांदा येथे पाठवणे : प.पू. नांदोडकर महाराज यांना काही कारणास्तव एक गाय आणि वासरू अर्पण करायचे होते. त्यांना ‘प.पू. भगवानदास महाराज हे एक मोठे तपस्वी संत बांदा येथे आहेत’, असे समजले. तेव्हा प.पू. नांदोडकर महाराज यांनी प.पू. भगवानदास महाराज यांच्याच आश्रमात गाय अर्पण करायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी वर्ष १९७० मध्ये श्री. माणगावकर आणि श्री. वामन यांना माणगावहून गाय अन् वासरू घेऊन बांदा येथे पाठवले.
२ आ. श्री. माणगावकर आणि श्री. वामन हे गाय आणि वासरू घेऊन बांदा येथील महाराजांच्या आश्रमात येणे अन् हात-पाय धुण्यासाठी आश्रमाजवळील झर्यात उतरणे : वर्ष १९७० मध्ये वाहनाची सोय नसल्याने श्री. माणगावकर आणि श्री. वामन हे चालत गाय अन् वासरू घेऊन बांदा येथील महाराजांच्या आश्रमात आले. गौतमारण्य आश्रमाच्या परिसरातच एक वहात्या पाण्याचा झरा आहे. बाहेर गावाहून आल्याने गाय अन् वासरू यांना पाणी पाजण्यासाठी ते झर्यात उतरले. श्री. माणगावकर आणि श्री. वामन यांनीही झर्यात हात-पाय धुतले.
२ इ. गौतमारण्य आश्रमातील वहात्या पाण्याच्या झर्यात हात-पाय धुतल्यावर श्री. वामन यांच्या शरिरावरील सर्व जखमा नाहीशा होणे अन् त्यांना गुरुकृपेमुळे भरून येणे : श्री. वामन यांना कुष्ठरोग असल्याने त्यांचे हात आणि पाय यांवर जखमा होऊन त्यांतून रक्त अन् पू येत असे. श्री. वामन हे पाण्यात डुबकी मारून वर आले. तेव्हा श्री. माणगावकर यांनी त्यांना पाहिले. त्या वेळी श्री. वामन यांच्या शरिरावरील सर्व डाग नाहीसे होऊन त्यांची त्वचा एकदम स्वच्छ झाली होती. शरिरावरील सर्व जखमा नाहीशा झाल्या होत्या. श्री. वामन यांनाही स्वतःकडे पाहून पुष्कळ आश्चर्य वाटून आनंद झाला. श्री. वामन यांना त्यांचे गुरु प.पू. नांदोडकर महाराज आणि प.पू. भगवानदास महाराज यांनी केलेल्या कृपेमुळे भरून आले.
२ ई. प.पू. भगवानदास महाराज यांच्या कठोर तपस्येमुळे घनदाट जंगल असलेली भूमी चैतन्यमय होणे, तेथील झर्यातील पाणीही निर्मळ होणे, प.पू. महाराज यांच्या चैतन्याची प्रचीती श्री. माणगावकर अन् श्री. वामन यांनी घेणे : प.पू. भगवानदास महाराज यांच्या कठोर तपस्येमुळे घनदाट जंगल आणि स्मशान भूमी असलेल्या जागेत आता आश्रमाच्या परिसरातील संपूर्ण भूमीही चैतन्यमय, पवित्र आणि प्रकाशमय झाली आहे. त्या भूमीत उगवणारी पाने, फुले आणि फळेही मधुर अन् रसाळ झाली आहेत. पाणीही निर्मळ आणि पवित्र झाल्याने तीर्थक्षेत्र बनले आहे. त्यामुळे प.पू. भगवानदास महाराज यांची तपसाधना आणि चैतन्य यांची प्रचीती श्री. माणगावकर अन् श्री. वामन यांना आली.
२ उ. गौतमारण्य आश्रमातील झर्याचे पाणी पवित्र होण्याची पार्श्वभूमी
२ उ १. प.पू. भगवानदास महाराज यांनी ‘सीतेमनी’ डोंगरावर कृष्णाकाठी साधना करणे : गौतमारण्य आश्रमाच्या भूमीची प्रचीती येण्यामागचे मुख्य कारण, म्हणजे पूर्वी प.पू. भगवानदास महाराज कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बागलकोट येथे ‘सीतेमनी’ (सध्याचे ‘अलमट्टी’ धरण जिथे बांधले आहे, ती जागा) डोंगरावर कृष्णाकाठी साधना करत होते. त्याच ठिकाणी कृष्णा तटावर एका डोंगरात वाल्मीकिऋषींचा आश्रम आहे. ‘रामायणात ज्या वेळी सीतामाई गरोदर असतांना श्री रामरायांच्या आज्ञेनुसार लक्ष्मणाने ज्या डोंगरावरील जंगलात सीतामाईंना सोडले होते, त्या ठिकाणाला ‘सीतेमनी डोंगर’, असे नाव आहे. ‘सीतेमनी’ म्हणजे मराठीत ‘सीतेचे घर’, असा अर्थ होतो.
२ उ २. कर्नाटक येथील सीतेमनी हे स्थान प.पू. भगवानदास महाराज यांना काही कारणाने सोडावे लागणे आणि प.प. श्रीधरस्वामींनी बांदा येथे जाऊन यापुढील साधना पूर्ण करण्यास सांगणे : सीतेमनी डोंगरावर प.पू. भगवानदास महाराज, पू. रुक्मिणी आई आणि प.पू. दास महाराज हे पूर्वी साधनेसाठी वास्तव्याला होते. त्या ठिकाणी प.पू. भगवानदास महाराज यांनी श्रीरामाचे मंदिर बांधायला प्रारंभ केला; परंतु त्यांना काही कारणास्तव श्रीराम मंदिराचे बांधकाम अर्धवट सोडून कर्नाटक येथील सीतेमनी हे स्थान सोडावे लागणार होते. त्यामुळे प.पू. भगवानदास महाराज यांना प.प. श्रीधरस्वामींनी पानवळ, बांदा येथील ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी राहून साधना केली, तिथेच राहून यापुढील साधना करण्यास सांगितली.
२ उ ३. बांदा येथील पाण्याच्या झर्याजवळ पूर्वी गौतमऋषींनी साधना केली असणे आणि त्यानंतर प.पू. भगवानदास महाराज यांनीही तिथेच कठोर तपस्या केल्यामुळे त्या झर्याला चैतन्य प्राप्त होणे : आता जो पाण्याचा झरा आहे, तिथे पूर्वी गौतमऋषींनी राहून साधना आणि तपश्चर्या केली आहे. पुढे प.प. श्रीधरस्वामींच्या आज्ञेने प.पू. भगवानदास महाराज यांनीही पानवळ, बांदा येथे राहून साधना आणि कठोर तपस्या केली. त्यामुळेच त्या पाण्याच्या झर्याला एवढे चैतन्य प्राप्त झाले आणि त्यामुळे तिकडे येऊन लोक झर्याचे पाणी तीर्थ म्हणून घेऊन जातात. कोणाला बाहेरची बाधा झाली असेल किंवा शारीरिक त्रास, त्वचा विकार आणि मानसिक त्रास होत असेल, तर या झर्याच्या पाण्याचा तीर्थ म्हणून वापर करतात आणि लोकांना त्याची प्रचीतीही येते.’
– आपला चरणसेवक दास,
प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२३.६.२०२२)