अतीवृष्टीग्रस्त शेतकर्यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – अतीवृष्टीमुळे पिकांची हानी झालेल्या शेतकर्यांना प्रतिहेक्टरी १३ सहस्र ६०० रुपये हानीभरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय १० ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून दिल्या जाणार्या हानीभरपाईच्या दुप्पट राज्यशासनाकडून हानीभरपाई देण्यात येणार आहे.’’
मेट्रो ३ प्रकल्पाची पहिली ‘फेज’ वर्ष २०२३ पर्यंत चालू होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मुंबईमधील ‘मेट्रो ३’ च्या वाढीव निधीला मंत्रीमंडळामध्ये मान्यता देण्यात आली. यापूर्वी २३ सहस्र कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे मूल्य आता ३३ सहस्र कोटी रुपये इतके झाले आहे. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे या प्रकल्पाचे काम बंद होते. प्रकल्पाचे ८५ टक्के कामे पूर्ण झाले असून कारडेपोचे काम २९ टक्के झाले आहे. यापुढे प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. वर्ष २०२३ मध्ये ‘मेट्रो ३’ची पहिली फेज चालू होईल. यामध्ये प्रतिदिन १७ लाख प्रवासी नियमित प्रवास करतील.