सेवेची तळमळ आणि गुरूंप्रती भाव असलेले मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. प्रशांत हरिहर (वय ४० वर्षे)!
मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. प्रशांत हरिहर (वय ४० वर्षे) यांचा १०.८.२०२२ (श्रावण शु. त्रयोदशी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे भाऊ, बहीण आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. प्रशांत हरिहर यांना सनातन परिवाराच्या वतीने ४० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. चेतन हरिहर (भाऊ), नागेशी, गोवा.
१ अ. काटकसरीपणा : ‘प्रशांतदादांचे दैनंदिन वापरातील कपडे पुष्कळ जुने झाले होते; म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही नवीन कपडे घ्या.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘हे कपडे जुने झाले आहेत; पण फाटलेले नाहीत. त्यामुळे मला कपडे नको.’’ अशा प्रकारे ते अनावश्यक व्यय करण्याचे टाळतात. ते वस्तू टाकाऊ होईपर्यंत तिचा वापर करतात.
१ आ. सेवेची तळमळ
१ आ १. उजवा हात दुखत असतांना डाव्या हाताने सेवा करणे : प्रशांतदादांचा उजवा हात पुष्कळ दुखतो. काही वेळा त्यांचा हात इतका दुखतो की, त्यांना उजव्या हाताने संगणकाचा ‘माउस’ चालवणे कठीण जाते. त्या वेळी ते डाव्या हाताने ‘माउस’ वापरतात. म्हणजे ते एकाच हाताने (आलटून पालटून) संगणकाचा ‘माउस’ आणि कळफलक (कीबोर्ड) दोन्ही वापरून सेवा करतात.
१ आ २. बहिणीच्या घरी गेल्यावरही सेवा चालू ठेवणे : काही मासांपूर्वी मी आणि प्रशांतदादा आमच्या बहिणीच्या (बनशंकरी अक्कांच्या) घरी गेलो होतो. त्या वेळी तेथेसुद्धा दादा त्यांची सेवा करत होते आणि अधूनमधून अक्काला साहाय्यही करत होते. दादा नातेवाइकांना आनंद होईल, असे त्यांच्याशी बोलत होते. हे सर्व झाल्यावर लगेचच ते पुन्हा सेवेला जात होते.
१ इ. गुरूंविषयीचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचा) भाव : काही प्रसंगांत दादांचा संघर्ष होतो. तेव्हा त्यांच्या मनात येणारे विचार ते मला मोकळेपणाने सांगतात. सर्व विचार सांगून झाल्यावर ते मला म्हणतात, ‘‘हे प्रसंग म्हणजे गुरुदेव घेत असलेली माझी परीक्षा आहे. यात मी उत्तीर्ण झालेच पाहिजे.’’ हा दृष्टीकोन ठेवून ते संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न करतात.
१ ई. प्रार्थना : प्रशांतदादांमधील ‘साधनेची तळमळ आणि गुरूंप्रतीचा भाव’ हे गुण माझ्यात येऊ देत, हीच गुरुचरणी प्रार्थना !’
२. सौ. बनशंकरी शिवशंकर (मोठी चुलत बहीण), शिवमोगा, कर्नाटक
२ अ. बोलतांना साधनेचे दृष्टीकोन देणे : ‘मी प्रशांतशी माझ्या अडचणींविषयी बोलल्यावर तो मला साधनेचे दृष्टीकोन देतो. त्यामुळे मला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. ‘माझे त्याच्याशी होणारे संभाषण म्हणजे ‘सत्संगच’ आहे’, असे मला वाटते. त्यातून मला पुष्कळ शिकायला मिळते.
२ आ. ‘गुरुदेवांनी मला सर्वकाही दिले आहे’, असा भाव असणे : सर्वांसाठी भेटवस्तू घेत असतांना मला त्याच्यासाठी काहीतरी घ्यावेसे वाटते. तेव्हा मी त्याला ‘तुला काय हवे ?’, असे विचारल्यावर तो मला म्हणतो, ‘‘गुरुदेवांनी मला सर्वकाही भरभरून दिले आहे. त्यामुळे मला काही नको.’’
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक : १७.७.२०२२)
सहसाधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना प्रेमाने घडवणारे श्री. प्रशांत हरिहर !
१. ‘श्री. प्रशांतदादा नेहमी आनंदी असतात. त्यांच्यात नम्रता आणि प्रेमभाव हे गुण आहेत.
२. सेवेची तळमळ
प्रशांतदादांची प्रकृती बारीक आहे, तरीही ते अनेक सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने अविरतपणे सेवा करतात.
३. वयस्कर साधकांच्या अडचणी समजून घेणे
आम्हा वयस्कर साधकांकडून सेवेत अनेक चुका होत असतात. तरीही प्रशांतदादा आमच्या अडचणी समजून घेतात. आमचे कौतुक करून आम्हाला सेवेसाठी प्रोत्साहन देतात. त्यांच्या या गुणांमुळे आम्हा सर्व साधकांना सेवा करतांना उत्साह वाटतो आणि आम्हाला त्यांचा आधार वाटतो. सेवेत काही अडचणी आल्यास आम्ही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतो.
४. सहसाधकांची प्रेमाने चौकशी करणे
काही वेळा आम्हा साधकांची प्रकृती बरी नसते. तेव्हा ते आम्हाला आवर्जून भ्रमणभाष करून आमची चौकशी करतात आणि आम्हाला विश्रांती घ्यायला सांगतात. आम्हाला सेवेविषयी भ्रमणभाष केल्यावरही ते प्रथम आमच्या प्रकृतीची चौकशी करतात आणि मग सेवेविषयी बोलतात. त्यांच्या या प्रेमळ बोलण्यामुळे आमचा थकवाही निघून जातो.
५. नवीन सेवा शिकण्यास प्रोत्साहन देणे
आम्ही नेहमी भाषांतर करण्यासाठी साधनेच्या संदर्भातील धारिका घेतो. त्या वेळी ते आम्हाला राष्ट्र अन् धर्म यांविषयीच्या धारिका देऊन आम्हाला पुढच्या पुढच्या टप्प्यांची सेवा शिकण्यासाठी प्रवृत्त करतात.
६. कृतज्ञता
हे गुरुदेवा, आपल्याच कृपेने आम्हाला प्रशांतदादांसारखा प्रेमळ साधक मिळाला. त्यांच्या माध्यमातून तुम्हीच आम्हाला सेवेची अमूल्य संधी देऊन त्यातून आनंद देत आहात. त्याविषयी आम्ही सर्व साधक आपल्या चरणी
कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्रीमती मीरा करी, सौ. नेहा निरंजन दाते, सौ. सुजाता अशोक रेणके आणि श्री. अशोक रेणके, फोंडा, गोवा. (२२.७.२०२२)