मातृ-पितृ देवो भव ।
महान हिंदु संस्कृतीत आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावे लागणे, हे हिंदू आणि शासनकर्ते यांना लज्जास्पद !
आई-वडिलांमुळे आपल्याला जन्म मिळतो. आई-वडील मुलांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपून त्यांचे पालनपोषण करतात; म्हणून मुले मोठी होतात आणि जीवनातील आनंद घेऊ शकतात. असे असतांना कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वृद्धाश्रमात ठेवणे किंवा त्यांना भारतामध्ये ठेवून विदेशात जाणे, असे प्रकार सर्रास पहायला मिळत आहेत. असे असले, तरी आई-वडिलांना आपली मुले प्रियच असतात. मुले कशीही वागली, तरी त्यांचे मुलांवरील प्रेम तसूभरही अल्प होत नाही. आई-वडील जिवंत असतांनाच स्वतःची मालमत्ता मुलांच्या नावे करतात. यामध्ये ‘मुलांना आपल्या पश्चात् काही त्रास होऊ नये’, असा विचार असतो; परंतु सर्वच मुले ‘काही झाले, तरी आई-वडिलांना अंतर द्यायचे नाही’, असा विचार करतांना दिसत नाहीत. काही मुले तर पालकांकडून त्यांची मालमत्ता बळजोरीने हिसकावून घेतात आणि त्यांना घराबाहेर काढतात. अशा उर्मट मुलांना जळगाव जिल्ह्यातील प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी धडा शिकवला आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा तालुक्यांमध्ये वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता मुले अन् सुना त्यांना घराबाहेर हाकलून देण्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी अशा मुलांना मालमत्ता पुन्हा वृद्ध आई-वडिलांच्या नावे करून द्यायला लावली, तसेच त्यातील २८ मुलांना आई-वडिलांचा सांभाळ करण्याचे आदेश देत धडा शिकवला. अशा प्रांताधिकारी लाभणे, हे सर्व पालकांना आधार देणारे आहे. असे असले, तरी ‘आई-वडिलांना सांभाळण्याविषयी प्रशासनाने सूचना देणे, इतकी आपली हिंदु संस्कृती खालावली आहे का ?’, असा प्रश्न पडतो. पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा आणि मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणाली यांचा परिणाम यांमुळे विभक्त कुटुंबपत अस्तित्वात आली. संपत्ती नावावर झाली की, मुले निर्धास्तपणे वागतात. त्यामुळे ‘संपूर्ण संपत्ती मुलांच्या नावावर न करता त्यातील काही उदरनिर्वाहासाठी उतारवयात शेष ठेवायला हवी’, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
‘मातृ-पितृ देवो भव ।’, ही संस्कृती असलेल्या भारतामध्ये पालकांवर अशी वेळ यायला नको. भेटीला आलेल्या भगवंताला वीट देऊन माता-पित्याच्या सेवेला प्राधान्य देणारा भक्त पुंडलिक, आई-वडिलांना कावडमध्ये बसवून तीर्थयात्रेला घेऊन जाणारा श्रावणबाळ, हे आदर्श मुलांसमोर येण्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धतच आवश्यक आहे.
– श्री. नीलेश पाटील, जळगाव