जातीयतेचे विष पेरणार्यांपासून सावध रहा ! – अभिनेते शरद पोंक्षे
भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेचा कार्यक्रम
लातूर, ९ ऑगस्ट (वार्ता.) – मागील पंधरा-वीस वर्षांत राज्यात जातीच्या भिंती बळकट करण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे, त्यापासून सावध रहा. संघटित होऊन जातीय विष पेरणार्यांना उत्तर द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. दयानंद सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘साहित्यातून राष्ट्र जागरण-बंकिमचंद्र ते सावरकर’ या विषयावर पोंक्षे यांनी विचार मांडले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम व्यावसायिक दिलीप माने, तर व्यासपिठावर ‘भारत विकास परिषदे’च्या लातूर शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक सुधाकर जोशी, सचिव अमित कुलकर्णी, डॉ. अभिजित मुगळीकर, अमोल बनाळे, सिद्धराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी शरद पोंक्षे म्हणाले की,
१. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्वनिष्ठ होते; पण त्यांनी जाती-जातींच्या भिंती तोडण्यासाठी प्रयत्न केले. रत्नागिरी जिल्हा जातमुक्त करण्यात त्यांना यश आले होते. ‘मनुष्य ही जात, माणुसकी हा धर्म आणि पृथ्वी हे राष्ट्र’, असे सावरकर यांचे तत्त्व होते; परंतु विशिष्ट चष्मा घालून सावरकरांकडे पाहिले जाते. ‘माणसाने माणसाशी माणुसकीने, प्रेमाने वागणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदु आहे’, असे सावरकर सांगत असत; मात्र सध्या जातीयवाद वाढत आहे.
२. ‘वंदे मातरम्’ या गीतामध्ये पृथ्वीचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यात कुठल्याही देवाची महती सांगण्यात आलेली नाही. लांगूलचालनामुळेच देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. आपल्यातील काहींनी स्वाभिमान विकला त्यामुळे राष्ट्र दुबळे झाले.
या वेळी दिलीप माने म्हणाले, ‘‘अंदमानात गेलो असता सेल्युलर जेल पाहून सावरकरांप्रती आदरभावाने डोके टेकवले.’’ या वेळी ‘ऋषि बंकिमचंद्र’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास शहरातील सहस्रो नागरिक, तसेच युवक-युवती उपस्थित होते.