संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची टीका !
मुंबई – पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात झालेल्या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते; पण त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान दिल्यामुळे भाजपच्या नेत्या सौ. चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला, तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी चालूच ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे.
संजय राठोड यांच्या शपथविधीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही व्यासपिठावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात विरोधी पक्षनेतेपदी असतांना संजय राठोड यांना पाठीशी घातले जात असल्याविषयी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. फडणवीस यांनी संजय राठोड यांच्यावर यापूर्वी केलेले आरोप मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होत आहेत.
संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याप्रकरणी पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पोलिसांनी संजय राठोड यांना ‘क्लीन चीट’ दिली असल्याचे म्हटले.