पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील अभिनेत्री आर्या घारे हिचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथील अभिनेत्री आर्या घारे हिने तिचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केला आहे. नवीन विचारांचा पायंडा पाडत अंधश्रद्धेचा निषेध करत हा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केल्याचे घारे कुटुंबियांनी सांगितले. आर्या घारे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
आर्या घारे हिने सांगितले की, अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करावा, ही संकल्पना आईला सुचली; म्हणून मी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. श्रीमंत असो किंवा गरीब त्याचा शेवट हा इथेच होतो. स्मशानभूमी हेच अंतिम सत्य आहे. इथून देहाला मुक्ती मिळते, मग स्मशानभूमी अपवित्र कशी ? तरुणांनी पुढे येऊन अंधश्रद्धा थांबवली पाहिजे. श्रद्धा असू द्या; पण ती अंध नसावी. (श्रद्धा कधीच अंध नसते, हे समजण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. परदेशातील लोक अध्यात्मामुळे भारताकडे आकृष्ट होऊन हिंदु संस्कृतीनुसार आचरण करत आहेत; पण भारतातील हिंदूंनाच महान हिंदु धर्म कळत नाही, हे दुर्दैव ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, हिंदु धर्माच्या विरोधात कृती करणार्या अभिनेत्रींचे अनुकरण करणे टाळा ! जग हिंदु धर्माकडे आकर्षित होत असतांना भारतात चालू असलेल्या धर्मविरोधी नवरुढी म्हणजे ‘दिव्याखाली अंधार !’ हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस तिथीनुसार आणि सात्त्विक वातावरणात साजरा केल्यास त्याचा लाभ त्या जिवाला होतो. स्मशानभूमीमध्ये असलेल्या रज-तमामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्याऐवजी हानीच होईल. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच व्यक्तीची योग्य-अयोग्याची जाण लोपत आहे, हे गंभीर आहे. |