११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या धर्मध्वजाच्या पूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रभु श्रीराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाशीर्वाद मिळावे, यासाठी सप्तर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी एका बाजूला सिंहासनाधिष्ठित प्रभु श्रीराम आणि दुसर्या बाजूला श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र असलेल्या धर्मध्वजाचे पूजन करून त्याचे आरोहण करण्यास (त्याला फडकावण्यास) सांगितले होते. त्याप्रमाणे ११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर तेथे उपस्थित असणार्या सनातनच्या संतांनी धर्मध्वजाला फुले वाहून नमन केले. त्यानंतर धर्मध्वजाचे आरोहण करण्यात आले. तेव्हा विधीचे माझ्याकडून देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. धर्मध्वजाचे पूजन करण्याचे महत्त्व
धर्मध्वज हा हिंदु धर्माचे प्रतीक आहे. त्यामुळे हिंदु धर्मामध्ये धर्मध्वजाचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसे केल्यामुळे धर्मध्वजाच्या रूपाने धर्मतत्त्वाचे पूजन होऊन धर्मकार्य करणार्या धर्मविरांना धर्मशक्ती मिळून धर्मसंस्थापना करण्यासाठी धर्मबळ मिळते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
२ अ. धर्मध्वज धर्मतत्त्वाने भारित होणे : धर्मध्वजाकडे धर्मलोकातून शक्ती आणि चैतन्य यांचा झोत आला. त्यामुळे धर्मध्वज धर्मतत्त्वाने भारित झाला.
२ आ. धर्मध्वजामध्ये प्रभु श्रीरामाचे तत्त्व कार्यरत होऊन पृथ्वीवर रामराज्य स्थापन करण्यासाठी प्रभु श्रीरामाने आशीर्वाद देणे : धर्मध्वजाचे पूजन केल्यामुळे त्यावर प्रभु श्रीरामाच्या चित्रातून पुष्कळ प्रमाणात श्रीरामाचे तत्त्व कार्यरत होऊन प्रक्षेपित झाले. तेव्हा धर्मध्वजातून रामतत्त्वाने युक्त असलेल्या निळसर रंगाच्या प्रकाशकिरणांचे प्रक्षेपण झाले. धर्मध्वजाचे पूजन झाल्यामुळे येणार्या काही वर्षांमध्ये भारत आणि संपूर्ण पृथ्वीवर रामराज्याचे लघुरूप असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याचे कृपाशीर्वाद प्रभु श्रीरामाने हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कार्यरत असणारे हिंदुत्वनिष्ठ, साधक आणि संत यांना दिले.
२ इ. धर्मध्वजातून धर्मतत्त्व पंचमहाभूतांच्या स्तरांवर प्रक्षेपित होणे : धर्मध्वजाच्या पंचोपचार पूजनातून प्रभु श्रीरामाचे तत्त्व धर्मतत्त्वाशी एकरूप झाले. त्यानंतर हे धर्मतत्त्व पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या स्वरूपात धर्मध्वजातून प्रक्षेपित होऊन संपूर्ण पृथ्वीवर कार्यरत झाले.
२ ई. धर्मध्वजाच्या पूजनामुळे त्यामध्ये सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्तरांवरील धर्मतत्त्व कार्यरत होणे : मूळ धर्मतत्त्वाची निर्मिती ‘ॐ’ कारातून झालेली आहे. त्यामुळे ‘ॐ’ हे हिंदु धर्माच्या निर्गुण तत्त्वाचे प्रतीक आहे, तर ‘स्वस्तिक’ हे सगुण तत्त्वाचे द्योतक आहे. जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाचे पूजन केले, तेव्हा या ध्वजाकडे ‘ॐ’चे ३० टक्के निर्गुण तत्त्व आणि ‘स्वस्तिक’चे २० टक्के सगुण तत्त्व आकृष्ट होऊन कार्यरत झाले. धर्मध्वजातून प्रक्षेपित होणार्या निर्गुण बिजात्मक तत्त्वामुळे धर्मशक्तीला सूक्ष्म स्तरावर अधर्मी शक्तींशी लढतांना यश मिळणार आहे. त्यानंतर धर्मध्वजातून प्रक्षेपित झालेल्या सगुण बिजात्मक तत्त्वामुळे धर्मशक्तीला स्थुलातून म्हणजे सगुण स्तरावर पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करता येणार आहे. अशाप्रकारे धर्मध्वजाच्या पूजनामुळे धर्मशक्तीला सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्तरांवरील धर्मतत्त्वांचा लाभ होऊन स्थुलातून पृथ्वीवर हिंदु राष्ट्र साकार होणार आहे.
२ ई १. धर्मध्वजामध्ये कार्यरत झालेल्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्तरांवरील धर्मतत्त्वांचे तौलनिक महत्त्व
३. संतांनी धर्मध्वजाला फुले वाहून अभिवादन करणे
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संतांनी धर्मध्वजाला फुले वाहून नमन केले. संतांमधील भक्तीमुळे धर्मध्वजाला वाहिलेल्या फुलांमुळे धर्मध्वजातील अवताररूपातील श्रीराम आणि गुरुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले प्रसन्न झाले अन् त्यांनी सर्व संतांची हिंदु राष्ट्र पृथ्वीवर स्थापन होण्याची समष्टी प्रार्थना स्वीकारली आणि त्यांना ‘तथाऽस्तु’ असा आशीर्वाद दिला. यावरून ‘भगवंताचे मन केवळ भक्तच जिंकू शकतो’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.
४. धर्मध्वजाच्या पूजनानंतर तो फडकावणे
त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वज फडकावला. तेव्हा धर्मध्वजामध्ये कार्यरत झालेली सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही स्तरांवरील धर्मशक्ती तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झाली. त्यामुळे धर्मध्वजातून पुष्कळ प्रमाणात धर्मतेज वायुमंडलात प्रक्षेपित झाले. त्यामुळे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या सभोवतालच्या वातावरणाची शुद्धी झाली. तसेच धर्मध्वजाकडे धर्मलोकातून धर्मशक्ती आणि धर्मचैतन्य यांचा प्रवाह अखंड येऊ लागला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीच्या वायुमंडलाची शुद्धीकरणाची प्रक्रिया वेगाने चालू झाली. त्यामुळे पृथ्वीचे प्रथम वायुमंडल आणि नंतर भूमी प्रत्यक्ष हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूरक अन् पोषक होणार आहे.
५. धर्मध्वजाच्या पूजनानंतर उपस्थित सर्व संतांनी कृतज्ञता व्यक्त केल्यावर धर्मदेवतेने आशीर्वाद देणे
धर्मध्वजाच्या पूजनानंतर उपस्थित सर्व संतांनी कृतज्ञताव्यक्त केल्यावर धर्मदेवतेने त्यांना आशीर्वाद दिले. या धर्मदेवाची उपरूपे असणारे यमदेव, शनिदेव, श्री बगलामुखीदेवी इत्यादी देवतांनीही पृथ्वीवर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आशीर्वाद दिल्याचे जाणवले.
कृतज्ञता
श्री गुरूंच्या कृपेमुळेच धर्मध्वजाच्या पूजनाच्या वेळी सूक्ष्म स्तरावर घडलेल्या प्रक्रियेचे ज्ञान मिळाले यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. |