कोल्हापुरात गेल्या २ दिवसांपासून संततधार : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
कोल्हापूर, ८ ऑगस्ट (वार्ता.) – गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३३ फूट २ इंच (धोक्याची पातळी ३९ फूट) झाली आहे. नदीवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली धरणात सध्या २९.७८ टी.एम्.सी. (८० टक्के धरण भरले) पाणीसाठा झाला असून धरणातून ३ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. राधानगरी धरण ८५ टक्के भरले असून तुळशी जलायशही ८२ टक्के भरले आहे. अलमट्टी धरण (कर्नाटक) ९५ टक्के भरले असून धरणातून ८ ऑगस्ट या दिवशी १ लाख घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला आहे.