योग्य निर्णयक्षमता आणि नेतृत्व हे गुण असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट !
‘१७.५.२०२२ या दिवशी छत्तीसगड येथे सकाळी हिंदु राष्ट्र कार्यशाळा आणि सायंकाळी हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले. एकाच दिवशी दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रम सेवेतील केवळ ५ – ६ कार्यकर्त्यांच्या संख्येत यशस्वीपणे पार पडणे, हे गुरुकृपा आणि चांगले नेतृत्व यांमुळेच शक्य झाले. त्या दिवशीच्या सकाळच्या कार्यशाळेत, तसेच सायंकाळच्या अधिवेशनात सेवा करत असतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांच्याकडून मला पुढील सूत्रे शिकायला मिळाली.
१. तत्परता
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कार्यक्रमस्थळी मोठी काच फुटली होती. तेव्हा दादांनी तत्परतेने त्या काचेचे चलत्चित्र (व्हिडिओ) काढले आणि ते संतांना पाठवून त्यांनी या सूक्ष्मातील आक्रमणासाठी कोणता नामजप करायला हवा ? हे विचारून घेतले.
२. निर्णयक्षमता
कार्यक्रमाचे दायित्व हिंदु जनजागृती समितीचे होते; परंतु स्थानिक संतांच्या सहयोगाने हे अधिवेशन आयोजित केले होते. त्यामुळे समितीचे कार्यकर्ते प्रत्येक गोष्ट स्थानिक संतांच्या सूचनांप्रमाणे करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. कार्यक्रम ६ वाजता चालू होणार होता. त्यानुसार हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कार्यक्रमस्थळी आले होते; मात्र स्थानिक संतांना येण्यास वेळ होता. तेव्हा इतर हिंदुत्वनिष्ठांचा वेळ जाऊ नये आणि संतांचा अनादर होऊ नये; म्हणून उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी ध्वनीचित्रफित दाखवली.
३. प्रेमभाव
अ. कार्यक्रमाच्या धावपळीतूनही दादा कार्यकर्त्यांची काळजी घेत होते. गाडीत बसल्यावर मी बिस्किटचा पुडा हातात घेतला. तेव्हा ‘मला भूक लागली आहे’, हे त्यांनी ओळखले आणि ‘समवेत आणलेला महाप्रसाद खाऊया’, असे सुचवले.
आ. सौ. केतकी किटकरु यांनी प्रथमच हिंदी कार्यक्रमात सूत्रसंचलन केले. तेव्हा ‘त्यांना ताण आला नाही ना ? आनंद मिळतो आहे ना ?’ अशी दादा चौकशी करत होते.
४. सेवेची तळमळ
कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापासून रात्री २ वाजेपर्यंत दादा सतत सेवा करत होते. त्यांची तळमळ बघून ‘मला आलेला थकवा आणि होत असलेला अंगदुखीचा त्रास त्यापुढे काहीच नाही’, असे जाणवले.
५. संघटनकौशल्य
५ अ. कार्यकर्त्यांना मनाने एकरूप करणे : कार्यशाळा आणि अधिवेशन यांची सेवा करणार्या कार्यकर्त्यांची मने एकरूप झाली होती. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आयोजन करणार्या कार्यकर्त्यांना विचारले, तरीही ते एकसारखेच मिळत होते. सुनीलदादांनी कार्यकर्त्यांचे या दृष्टीने चिंतन करवून घेतल्याचे मला जाणवले.
५ आ. कार्यकर्त्यांकडून हिंदु संघटनाचे कार्य करवून घेणे : दादांच्या मनात ‘हिंदुत्वनिष्ठांचे प्रभावी संघटन करणे’, हाच ध्यास असतो. त्यामुळे त्यांच्या समवेत सेवा करणार्या कार्यकर्त्यालाही ते त्याच दृष्टीने सिद्ध करतात. कितीही मोठी आणि अशक्य वाटणारी सेवा असली, तरीही सेवा करणार्या कार्यकर्त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचा ताण नव्हता. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:ची सेवा संपूर्ण कौशल्य वापरून समय मर्यादेत करण्याचा प्रयत्न करत होता. यावरून ‘योग्य नेतत्ृव असले, तर इतरही आपला कार्यभाग कसे पार पाडू शकतात ?’, हे मला शिकायला मिळाले.
६. चुकांचे गांभीर्य असणे
कार्यक्रमाच्या धावपळीतही दादा आमच्या चुका आम्हाला सांगत होते आणि चुकांविषयीचे गांभीर्य लक्षात आणून देत होते.
७. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य
एवढ्या सर्व धावपळीतही दादांनी प्रतिदिन आपले नामजपादी उपाय पूर्ण केले.
८. संतांप्रती भाव
कार्यक्रमाच्या नियोजनाची सेवा करत असतांना दादांचे संतांकडेही लक्ष होते. ते मला थोड्या थोड्या वेळाने ‘संतांना काय हवे-नको’, याची चौकशी करायला सांगत होते.
‘हे भगवंता, दादांच्या माध्यमातून तू आम्हाला ‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी तळमळीने प्रयत्न कसे करायचे ?’, हे शिकवलेस. तू आमच्याकडून त्याप्रमाणे कृतीही करवून घे. हिंदु संघटनाच्या या व्यापक कार्यात आमचाही खारीचा वाटा असू दे, अशी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. गौरी विद्याधर जोशी, नागपूर (२६.५.२०२२)