दुर्गुण आणि अहंकार काढून सद्गुणांचे संवर्धन करणे, हेच मनशांतीचे गमक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक हिंदु जनजागृती समितीचे
भोपाळ (मध्यप्रदेश) – तण उगवण्यासाठी काहीही कष्ट घ्यावे लागत नाही; परंतु बाग विकसित करण्यासाठी आपल्याला कष्ट आणि नियोजन दोन्ही आवश्यक असते. त्याचप्रमाणे जीवनात तणाव दूर करून शांती प्राप्त करण्यासाठी गुणसंवर्धनाने दोष आणि अहंकार यांचे तण काढून फेकले पाहिजे. भौतिक शिक्षण देतांना विद्यार्थ्यांमध्ये गुणसंवर्धनाचे प्रयत्न केल्याने त्यांचा तणाव दूर होऊन निश्चितपणे त्यांच्यात एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या अंतर्गत ‘तणाव प्रबंधन’ या विषयावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी ‘लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक राय यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा रोपटे आणि श्री. अमितबोध उपाध्याय यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मार केला. या मार्गदर्शनाचा अनेक प्राध्यापकांनी लाभ घेतला.
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की,
१. सध्या वाढता तणाव हा चिंतेचा विषय बनला आहे. राष्ट्रीय गुन्हेगारी नोंदणी विभागाच्या सर्वेक्षणानुसार भारतात प्रती घंट्याला १ युवक आत्महत्या करतो. युवकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये इंदूरमध्ये ४ टक्के आणि भोपाळमध्ये १४ टक्क्यांनी वृद्धी झाली आहे.
२. प्रेमविवाह, मानसिक दुर्बलता, परिक्षेतील अपयश आदी कारणांमुळे होत असलेल्या या आत्महत्या थांबवण्यासाठी पुढे येणे स्वतःचे दायित्व आहे. क्षमतेचा विचार न करता मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे, हे आजच्या तणावाचे एक कारण आहे.
३. कोणत्याही कारणामुळे तणाव निर्माण झाला असेल; पण त्याच्या मुळाशी गेल्यावर या तणावासाठी परिस्थितीपेक्षा स्वतःचे दुर्गुण आणि अहंकार अधिक उत्तरदायी असतात, असे लक्षात येते.
४. आपण दुर्गुण दूर करण्यासाठी गुणांचे संवर्धन केले आणि अहंकाराचा त्याग करून स्वतःच्या चुका स्वीकारणे चालू केले, तर आपण निश्चितपणे तणावमुक्त होऊ शकतो. हे करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली उर्जा ईश्वराच्या स्मरणाने प्राप्त होईल.
अभिप्राय :
१. श्री. अभिनव भार्गव : आजच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्यक्ष आचरण केले, तर चांगले परिणाम मिळतील.
२. डॉ. भूपेंद्र त्रिपाठी : स्वतःच्या कार्यक्षेत्रातील तणाव दूर कसा करावा ? भौतिक युगात सतत येणारे तणाव कसा दूर करावा ? आदी विषयांच्या संदर्भात सखोल माहिती मिळाली.