महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने डॉ. (सौ.) सहना भट यांनी केलेल्या भरतनाट्यम् नृत्याचा संशोधनाच्या दृष्टीने घेतलेल्या प्रयोगाची क्षणचित्रे !
‘३.८.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. (सौ.) सहना भट यांच्या विविध नृत्यांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग करून घेण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी ‘पुतना-मोक्ष’ या विषयावर एकल (एकटीने सादर करण्याचे) नृत्य सादर केले. डॉ. (सौ.) सहना भट यांनी या नृत्याच्या माध्यमातून ‘कंसाच्या सांगण्यावरून पुतना राक्षसी बाल श्रीकृष्णाला मारण्यासाठी येते आणि त्यानंतर साक्षात् भगवान श्रीकृष्णाच्या हातून तिला मृत्यू येऊन मोक्षप्राप्ती होते’, हा प्रसंग सादर केला. या वेळी या नृत्यातून साकारलेल्या ‘प्रत्येक प्रसंगाला साजेसे हावभाव चेहर्यावर सहजतेने येणे आणि या भावांमध्ये क्षणार्धात पालट करणे’, हे त्यांचे वैशिष्ट्य लक्षात आले. आरंभी रौद्रभाव, नंतर वात्सल्यभाव, त्यानंतर करुणभाव आणि शेवटी श्रीकृष्णाच्या हातून मृत्यू आल्यावर त्याच्या चरणी विलीन होण्याचा शरणागतभाव यांचा सुंदर संगम डॉ. (सौ.) सहना भट यांच्या या नृत्यातून दिसून आला.
या वेळी ‘या एकल नृत्याचा आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि त्रास असलेल्या साधकांवर, तसेच झाडांवरही काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी तुळस, गुलाब आणि कॅक्टस ही झाडेही प्रयोगाच्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. या नृत्याच्या वेळी उपस्थित असलेले संत, त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक यांना आलेल्या अनुभूती अन् प्रयोगाचा निष्कर्ष येथे दिला आहे.
१. संतांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
१ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
१ अ १. डॉ. (सौ.) सहना भट नृत्यातून पूतनेचा भाव प्रकट करत असतांना वातावरणात त्या त्या भावाची स्पंदने प्रक्षेपित होणे : ‘डॉ. (सौ.) सहना भट ‘पूतना’ ही व्यक्तीरेखा साकारत असतांना त्यांनी राग आणि वात्सल्यभाव यांचे योग्य संमिश्र भाव चेहरा अन् हावभाव यांतून उत्कृष्टपणे दाखवले. त्या पूतनेचा अभिनय करतांना ‘पूतना राक्षसी रागाने बघते’, असे दर्शवतांना ‘वातावरणात अग्नितत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. बाल श्रीकृष्णाला पाहिल्यावर त्यांनी पूतनेचा जो भाव प्रगट केला, त्यातून वातावरणात चांगली स्पंदने प्रक्षेपित झाली. त्यांनी ‘पूतनेने बाल श्रीकृष्णाला हातात घेतले’, हे दर्शवले. तेव्हा मला थंड लहरी जाणवल्या. नृत्यातील प्रसंगानुरूप त्या जो जो भाव दर्शवत होत्या, ते ते तत्त्व वातावरणात प्रक्षेपित होत होते. सौ. सहना भट यांचे नृत्य संपल्यावर वातावरणात चांगली स्पंदने प्रक्षेपित झाली.’
२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेला आलेली अनुभूती
२ अ. सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए. संगीत), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
२ अ १. डॉ. (सौ.) सहना भट यांनी ‘पूतनेने बाल श्रीकृष्णाला हातात घेतले’, हे दृश्य सादर करतांना ‘प्रत्यक्ष भगवंताला हातात घेतले आहे’, या भावाने नृत्य करणे, ते पाहून भावजागृती होणे : ‘मला नृत्यातील प्रत्येक प्रसंग जिवंत वाटला. ‘पूतनेने बाल श्रीकृष्णाला हातात घेतले’, हे दृश्य पहातांना ‘त्यांनी साक्षात् भगवंताला हातात घेतले, तो क्षण किती सुंदर असेल !’, असा विचार मनात येऊन माझा भाव जागृत झाला. डॉ. (सौ.) सहनाताईंनीही त्याच भावाने नृत्य प्रस्तुत केले.’
३. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना आलेल्या अनुभूती
३ अ. कु. मधुरा चतुर्भुज : ‘डॉ. (सौ.) सहनाताई तेच नृत्य दुसर्यांदा सादर करत असतांना मला त्यांच्याभोवती सोनेरी प्रकाश दिसून त्यातून चैतन्य मिळत होते.’
३ आ. सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे : ‘डॉ. (सौ.) सहनाताई यांचे नृत्य पहातांना मला आनंदाची स्पंदने जाणवून माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. त्यांनी सादर केलेल्या वात्सल्यभावात मला जिवंतपणा जाणवला.’
३ इ. सौ. शुभांगी : ‘डॉ. (सौ.) सहनाताई यांचे नृत्य पहातांना माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता न्यून होऊन माझी भावजागृती झाली.’
३ ई. कु. कल्याणी गांगण : ‘डॉ. (सौ.) सहनाताई यांनी सादर केलेल्या नृत्यातील प्रत्येक प्रसंग मला जिवंत वाटला. नृत्य संपल्यावर माझा श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप चालू झाला.’
४. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेल्या परीक्षणातून जाणवलेली सूत्रे
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा २५ ते ४८ टक्क्यांनी अल्प झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा ८५ ते ५०४ टक्क्यांनी वाढली.
आ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांतील नकारात्मक ऊर्जा ६३ ते ७३ टक्क्यांनी अल्प झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा १७९ ते २८६ टक्क्यांनी वाढली.
इ. डॉ. (सौ.) सहाना भट यांच्यातील नकारात्मक ऊर्जा ७३ टक्क्यांनी अल्प झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा २८५ टक्क्यांनी वाढली.
ई. प्रयोगाच्या ठिकाणी ठेवलेल्या तिन्ही झाडांमधील नकारात्मक ऊर्जा ३८ ते ५७ टक्क्यांनी अल्प झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा १६९ ते १२४६ टक्क्यांनी वाढली.
५. परीक्षणाचे निष्कर्ष
५ अ. ‘भरतनाट्यम्’ या शास्त्रीय नृत्याने उपस्थितांची नकारात्मता न्यून होऊन सकारात्मकता वाढणे : भरतनाट्यम् हा भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार असून यामध्ये मुळातच सात्त्विकता आहे. डॉ. (सौ.) सहना भट यांनी नृत्याशी संपूर्णपणे एकरूप होऊन नृत्य सादर केले. ‘डॉ. (सौ.) सहनाताई यांच्यातील भावामुळे त्यांची सकारात्मकता वाढली, तसेच त्यांच्या या भावपूर्ण नृत्याचा नृत्य पहाणारे साधक आणि तेथे ठेवलेली झाडे यांवरही सकारात्मक परिणाम झाला. सर्वांची नकारात्मक ऊर्जा घटली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली’, असे या प्रयोगातून लक्षात आले.’
– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.८.२०२२)
|