काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस !
१ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
मुंबई – काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या पाठिंब्याने मढ मार्वे येथे अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात येऊन १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने कारवाई चालू केली आहे.
या प्रकरणी शासनाने मुंबई जिल्हाधिकारी आणि मुंबई महानगरपालिका यांनाही कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. किरीट सोमय्या यांनी यापूर्वी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते, तसेच मोठ्या नेत्यांची नावे घेत ते कारागृहात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख, आमदार नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत कारागृहात आहेत. सोमय्या यांनी उघडकीस आणलेल्या अनधिकृत स्टुडिओच्या प्रकरणात काँग्रेसचे अस्लम शेख यांनाही कारागृहात जावे लागणार असल्याची चर्चा आहे.