‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ भव्य कावळ पदयात्रा पार पडली !
ठाणे, ६ ऑगस्ट (वार्ता.) – ‘हिंदु युवा वाहिनी’कडून बदलापूर ते अंबरनाथ अशी भव्य कावळ पदयात्रा नुकतीच काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये सर्व हिंदु संघटनांचे सदस्य, पदाधिकारी, हिंदु युवा वाहिनीचे सदस्य, तसेच बदलापूर आणि अंबरनाथ येथील शिवभक्त यांनी भगवे वस्त्र परिधान करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
‘हिंदु युवा वाहिनी फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि प्रदेश महामंत्री श्री. अभिषेक राव यांनी ६ वर्षांआधी २० भक्तांना घेऊन बदलापूरजवळील कोंडेश्वर शिवमंदिर येथील कुंड आणि नदी यांमधून कावळ घेऊन ते जल अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात आणले अन् तेथे जलाभिषेक करण्याची प्रथा चालू केली. आता भक्तांची संख्या साडे सात सहस्रांपर्यंत पोचली आहे.
सर्वजण पहाटे ४ वाजता बदलापूरजवळील कोंडेश्वर मंदिरामध्ये जमले. तेथील नदी आणि कुंड येथे स्नान करून प्रत्येकाने कावळ भरून घेतली. सकाळी ७ वाजता कोंडेश्वर मंदिरामधून अनवाणी पदयात्रा निघाली. दुपारी २ वाजता पदयात्रा प्राचीन शिवमंदिराच्या ठिकाणी पोचली. प्रत्येक चौकात फुलांच्या वर्षावाने पदयात्रेचे स्वागत झाले. पदयात्रेला इंदूर येथील नाथ संप्रदायाचे योगी विजेंद्रनाथ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.