हिंदूंना लक्ष्य केल्यास जशास तसे उत्तर देऊ ! – नितेश राणे, नेते, भाजप
मुंबई येथे पत्रकार परिषद
मुंबई – देशात शरीयत कायदा लागू झालेला नाही. ‘जर हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ’, अशी चेतावणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर देशात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या धमक्या हिंदूंना मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी ही चेतावणी दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाही. नवाब मलिक अल्पसंख्यांक विकासमंत्री राहिलेले नाहीत.
२. नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याने अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या झाली. भाजप नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही.
३. नगरमधील कर्जत येथेही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. या आक्रमणात गंभीर घायाळ झालेला तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे.
४. आमच्या देवतांची विटंबना केली गेली, तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देतो; मात्र एकालाही जिवे मारल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का ? पण तुम्ही तशी पावले उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावे लागेल. हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.