हिंदु जनजागृती समितीकडून सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) हिंदु राष्ट्राच्या विचारधारेचा प्रसार आणि त्याला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद !
गेल्या काही वर्षांमध्ये ‘सोशल मिडिया’ अर्थात् व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबूक आदी माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभरातील निम्म्याहून अधिक म्हणजे जवळपास ५८ टक्के लोक ‘सोशल मिडिया’चा वापर करतात. भारतातही हे प्रमाण जवळपास ५४ टक्के आहे. ‘हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, तसेच हिंदूंवर होणारे आघात सर्वांसमोर यावेत’, यांसाठी हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१६ पासून ‘सोशल मिडिया’च्या वेगवेगळ्या प्रणालींच्या माध्यमातून प्रसार करण्यास आरंभ केला. वर्ष २०१९ मध्ये ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्ये १ दिवसाच्या ‘सोशल मिडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. गुरुकृपेने चालू झालेल्या या ‘सोशल मिडिया’रूपी रोपट्याची अल्पावधीतच झपाट्याने वाढ होत असल्याचे आम्ही अनुभवत आहोत. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष घराबाहेर पडून धर्मप्रसार करण्यास मर्यादा आल्या, तेव्हा ‘सोशल मिडिया’द्वारे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला.
१. ‘सोशल मिडिया’तून धर्मप्रसार
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडलेले शेकडो कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी प्रतिदिन ‘जागो’ संदेशाच्या माध्यमातून ‘व्हॉट्सॲप’द्वारे प्रसार करतात. ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून होणार्या या प्रसारामुळे प्रतिदिन लाखो लोकांपर्यंत धर्मशिक्षण आणि धर्मजागृती संदेश नियमितपणे पोचत आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या ‘ट्विटर’वरील @HinduJagrutiOrg या अधिकृत खात्याची सदस्यसंख्या ५४ सहस्र ९०० हून झाली आहे, तर ‘टेलिग्राम’च्या अधिकृत खात्याची सदस्य संख्या ९ सहस्र ६०९ झाली आहे. यासोबतच ‘कू’, ‘पिनट्रेस्ट’ या माध्यमांतूनही समितीचे हिंदु जागृतीचे कार्य चालू आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या www.hindujagruti.org या संकेतस्थळाला प्रतिमास १ लाख २० सहस्रांहून अधिक जण भेट देतात. हे संकेतस्थळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांमध्ये कार्यरत आहे.
२. कोरोना महामारीच्या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम आणि त्यांना मिळालेले यश
२ अ. ‘ऑनलाईन’ कार्यक्रम : कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून देशभरात दळणवळण बंदी लागू करण्यात आली आणि सर्वत्रचे जनजीवन ठप्प झाले होते. अशी स्थिती असतांना अवघ्या एका आठवड्यात हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याच्या स्वरूपात पालट झाला. उपलब्ध असलेल्या तांत्रिक साधनांच्या आधारे ऑनलाईन धर्मप्रसार चालू करण्यात आला.
यामध्ये ऑनलाईन ४ कार्यक्रमांच्या शृंखला प्रतिदिन चालू केल्या. धर्म, संस्कृती, इतिहास आदींच्या विविध अंगांची शास्त्रशुद्ध माहिती देणारा ‘धर्मसंवाद’, समाजाला साधना शिकवणारा ‘नामजप सत्संग’, मुलांना सुसंस्कारित करणारा ‘बालसंस्कारवर्ग’ आणि ईश्वराप्रती भाव कसा वाढवावा, हे सांगणारा ‘भावसत्संग’ असे ४ कार्यक्रम चालू केले. हे कार्यक्रम प्रतिदिन ‘फेसबूक’ आणि ‘यू ट्यूब’ या माध्यमांतून प्रसारित केले.
हे ऑनलाईन कार्यक्रम आम्ही हिंदीत चालू केले आणि नंतर हेच कार्यक्रम आम्ही कन्नड, मल्याळम्, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्येही चालू केले. कोणताही पूर्वानुभव नसतांना चालू झालेले हे ऑनलाईन कार्यक्रम आजही नियमितपणे चालू आहेत. या ऑनलाईन कार्यक्रमांपैकी ‘नामजप सत्संगा’चे ६०० हून अधिक भाग, ‘धर्मसंवाद’चे ४०० हून अधिक भाग, ‘भावसत्संगा’चे ४०० हून अधिक भाग आणि ‘बालसंस्कारवर्गा’चे ३०० हून अधिक भाग आतापर्यंत प्रसारित झाले आहेत. या कार्यक्रमांची आतापर्यंत एकूण दर्शकसंख्या २ कोटी २० लाख ९३ सहस्रांहून अधिक झाली आहे. कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम् या भाषांतील कार्यक्रमांची एकूण दर्शकसंख्या २७ लाख ७२ सहस्रांहून अधिक झाली आहे. या कार्यक्रमांमुळे ‘धर्मशिक्षण मिळाले’, ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व लक्षात आले’, ‘कोरोनामुळे निर्माण झालेली नकारात्मकता जाऊन जीवनाला सकारात्मक दिशा मिळाली’, असे अभिप्राय दर्शकांनी मोठ्या प्रमाणात कळवले.
हे ऑनलाईन कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदुजागृती’ या ‘यू ट्यूब’ चॅनेलवरून प्रक्षेपित करण्यात आले. हे कार्यक्रम चालू होण्यापूर्वी या चॅनेलचे ‘सबस्क्रायबर्स’ अर्थात् सदस्य संख्या ३० सहस्र होती. या २ वर्षांच्या कालावधीत या चॅनेलचे सबस्क्रायबर्स १ लाखांहून अधिक झाले आहेत. ‘यू ट्यूब’वर एखाद्या चॅनेलचे १ लाख सदस्य झाल्यावर त्यांना ‘सिल्व्हर ट्रॉफी (मानचिन्ह)’ देण्यात येते. यावर्षी ‘यू ट्यूब’ने हिंदु जनजागृती समितीला ‘सिल्व्हर ट्रॉफी’ पाठवून सन्मानित केले आहे.
२ आ. ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ हा विशेष संवाद : ऑनलाईन कार्यक्रमांच्या जोडीला समितीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ हा ऑनलाईन ‘विशेष संवाद’ अर्थात् राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या संदर्भात मान्यवरांचे चर्चासत्र हा उपक्रमही आरंभ केला. या ‘चर्चा हिंदु राष्ट्र की – विशेष संवादा’चे आतापर्यंत १४० हून अधिक भाग लाईव्ह (थेट प्रसारण) करण्यात आले आहेत. याचा ६ लाखांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला आहे. या चर्चासत्रांमध्ये धर्मांतर, राष्ट्रीय सुरक्षा, लव्ह जिहाद, शिक्षणव्यवस्था, मंदिर सरकारीकरण, धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेली आक्रमणे, वेब सीरिजच्या माध्यमातून होत असलेले हिंदु धर्माचे विकृतीकरण आदी विविध विषयांवर जागृती करण्यात आली.
२ इ. ‘ऑनलाईन’ आंदोलने : वर्ष २०१२ मध्ये झालेल्या प्रथम अधिवेशनामध्ये ‘समान कृती कार्यक्रमा’च्या अंतर्गत राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात प्रतिमास‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ करण्याचे निश्चित झाले होते. गेल्या ९ वर्षांपैकी गेली २ वर्षे सोडली, तर ७ वर्षांमध्ये १ सहस्र ७०० हून अधिक प्रत्यक्ष ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलने’ करण्यात आली आहेत. गेली २ वर्षे कोरोना काळात प्रत्यक्ष आंदोलने थांबली असली; तरीही हीच आंदोलने ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू झाली आणि दळणवळण बंदी काळातही हिंदु जागृतीचा हा उपक्रम थांबला नाही. आंदोलनांचे स्वरूप ‘ऑनलाईन’ असल्याने या आंदोलनांना स्थळाचे बंधन राहिले नाही. अनेक आंदोलने आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोचली. या आंदोलनांत जगभरातील अनेक देशातील धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.
२ इ १. शत्रूराष्ट्र चीनने जेव्हा सीमावर्ती भागात घुसखोरी केली, तेव्हा समितीने #ChineseProductsInDustbin हे ऑनलाईन आंदोलन ‘ट्विटर’च्या माध्यमातून केले. अनेकांनी हातात ‘प्लाकार्डस्’ (फलक धरून) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. अनेकांनी चिनी वस्तू कचर्याच्या डब्यात फेकून देत असल्याचे व्हिडिओ, तसेच छायाचित्रे प्रसारित करून या आंदोलनात सहभाग घेतला. हा विषय ‘ट्विटर ट्रेंड’मध्ये (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ व्या स्थानी होता. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात जागृती झाली.
२ इ २. ‘काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य घटक आहे’ हे सांगण्यासाठी पाकिस्तानमध्ये ५ फेब्रुवारी हा ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याला समर्थन म्हणून ‘पिझ्झा हट’, ‘ह्युंदाई मोटर्स’, ‘के.एफ्.सी. फूडस्’, ‘किया मोटर्स’ या आस्थापनांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यांवरून ‘ट्वीट’ करत पाकिस्तानचे समर्थन केले. या विरोधातही आम्ही ‘ट्विटर’वर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. लोकांचा वाढता रोष पहाता ‘ह्युंदाई मोटर्स’ आणि ‘के.एफ्.सी. फूडस्’ या आस्थापनांनी याविषयी क्षमा मागून केलेले ट्वीट मागे घेतले.
२ इ ३. एम्.पी. अहमद यांच्या मालकीच्या ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या आस्थापनाने अक्षय्य तृतीयेच्या निमित्त दागिन्यांचे विज्ञापन प्रसारित केले होते. त्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर खान हिला दागिन्यांनी मढवलेले मात्र हेतूतः कपाळावर कुंकूविना दाखवले होते. या विज्ञापनाचा ‘सोशल मिडिया’द्वारे मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. या वेळी ट्विटरवर #NoBindiNoBusiness हा हॅशटॅग वापरत ट्रेंड करण्यात आला. हिंदूंच्या संघटित विरोधामुळे ‘मलबार गोल्ड’ने करीना कपूर खानचे विज्ञापन हटवून अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे टिकली लावलेले विज्ञापन प्रसिद्ध केले. ‘हिंदूंचे धार्मिक उत्सव हे हिंदु परंपरा आणि संस्कृती यांनुसारच साजरे केले पाहिजेत, हे भारतात व्यापार करणार्यांनी लक्षात घेतले पाहिजे’, हा संदेश या माध्यमातून पोचवण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना यशस्वी ठरल्या.
२ ई. ‘ऑनलाईन साईन पिटीशन’मुळे (संकेतस्थळाच्या माध्यमातून केलेली याचिका) मिळालेले यश : हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर होत असलेल्या आघातांचा विरोध करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे ‘ऑनलाईन साईन पिटीशन’ मोहिम’. समितीच्या वतीने २५ हून अधिक यशस्वी ‘ऑनलाईन पिटीशन’ घेण्यात आल्या.
२ ई १. वेबसिरीज, चित्रपट, मालिका, विज्ञापने आदी माध्यमांतून हिंदु देवता, राष्ट्रपुरुष यांचा सर्रास अवमान होत आहे. काही वेबसिरीजमधून भारतीय सैन्य दलाचाही अवमान केला गेला. याविरोधात समितीने साईन पिटीशन मोहीम राबवली. अनेकांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. परिणामस्वरूप भारतीय सैन्याने निर्णय घेतला की, कोणत्याही चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये सैन्याविषयी काही दाखवायचे असल्यास सैन्याचे ‘ना हरकत’ पत्र आवश्यक आहे. सरकारने सर्व ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवरील (‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’. आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’.) मालिका सेन्सॉर बोर्डाच्या नियंत्रणाखाली आणल्या.
२ ई २. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या हिंदु आणि राष्ट्र द्रोही संघटनेवर बंदी घालण्यासाठी साईन पिटीशन मोहीम राबवण्यात आली. सध्या केंद्र सरकार या संघटनेवर बंदी घालण्याच्या विचारात आहे.
यासह संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू व्हावा, मंदिरावर होणारे आघात थांबावे, अशा अनेक मागण्यांसाठी साईन पिटीशन मोहिमा प्रभावीपणे राबवल्या गेल्या.
३. फेसबूकचा हिंदुद्वेष
‘सोशल मिडिया’द्वारे हिंदुत्वाचे कार्य विहंगम् मार्गाने होत असले, तरी ते करतांना आम्हाला मोठ्या प्रमाणात विरोधालाही सामोरे जावे लागले आहे. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे ‘फेसबूक’ ! वर्ष २०१२ मध्ये फेसबूकने हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत फेसबूक पेजवर बंदी आणली होती, त्यानंतर आम्ही अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या प्रसारासाठी चालू केलेल्या ‘हिंदु अधिवेशन’ या पेजद्वारे धर्मप्रसार चालू ठेवला. वर्ष २०२१ मध्ये कोणतेही कारण न देता तब्बल १४ लाख ५० सहस्र ‘फॉलोअर्स’ असलेले हे पेजही फेसबूकने बंद केले. सातत्याने भारतविरोधी आणि हिंदुविरोधी प्रचार करणारे डॉ. झाकीर नाईक अन् हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे ओवैसी बंधू यांची ५० हून अधिक पेजेस, तर देशद्रोहाचे आरोप असलेल्या कन्हैयाकुमार अन् उमर खालिद यांची फेसबूक पेजेस आजही चालू आहेत; मात्र जोरकसपणे हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणार्या समितीचे पेज फेसबूकने बंद केले. समितीची राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा या स्तरांवरील एकूण ३९ पेजेस बंद करण्यात आली आहेत. यानंतर आम्ही अभ्यास केल्यावर कळले की, हिंदुत्वनिष्ठ असलेली ‘सुदर्शन वाहिनी’ आणि त्याचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह अन् अध्यात्माचा प्रसार करणार्या सनातन संस्थेचीही ५ फेसबूक पेजेस बंद करण्यात आली आहेत. यावरूनच फेसबूकचा हिंदुद्वेष स्पष्ट दिसून येतो. ‘आमची काही ‘पेजेस’ बंद करून हिंदुत्वाचा आवाज दडपला जाईल’, असे फेसबूकला वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे.
४. सोशल मिडियाद्वारे करावयाचे आगामी कार्य
हिंदु राष्ट्राचा विचार १०० कोटी हिंदूंपर्यंत पोचवायचा आहे, यासाठी ‘सोशल मिडिया’ हे एक प्रभावी माध्यम आहे. या दृष्टीने पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येतील –
अ. ‘सोशल मिडिया’चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी त्याच्या प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करा. यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला साहाय्य करील.
आ. नवनवीन येणार्या सोशल मिडियांवर सक्रीय होऊन हिंदु राष्ट्राचा प्रसार करा.
इ. सोशल मिडियातील हिंदु राष्ट्राच्या प्रसाराची नोंद वृत्तवाहिन्यांना घ्यावी लागेल, एवढा प्रभावी प्रचार करा.
ई. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचे हिंदूंना आवाहन करा.
उ. हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण, तसेच हिंदु राष्ट्राची वैचारिक भूमिका मांडणार्या विविध पोस्ट (लिखाण) प्रतिदिन प्रसारित करत असते. त्यांचा प्रसार करा.
– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (४.५.२०२२)