जागतिकीकरणामुळे स्थानिक संस्कृतींना धोका ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा
भाग्यनगर – झपाट्याने होत असलेल्या जागतिकीकरणामुळे अनेक ठिकाणी स्थानिक संस्कृतींना धोका निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले. येथील उस्मानिया विद्यापिठाच्या ८२ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी सरन्यायाधीश रमणा यांना विद्यापिठाच्या वतीने ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
Global culture is emerging as a threat to local cultural symbols and identities: CJI NV Ramana
Read story: https://t.co/OGycxYC2Ww pic.twitter.com/2pNPb5f0dk
— Bar & Bench (@barandbench) August 6, 2022
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की,
१. सध्या झपाट्याने जागतिकीकरण होत आहे, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्यामुळे जगभरातील विविध संस्कृतिक पार्श्वभूमी असलेले लोक एकमेकांशी जोडले जात आहेत.
२. अशा प्रकारे जग जवळ येत असतांना स्थानिक संस्कृती, चिन्हे आणि ओळख यांना धोका निर्माण झाला आहे. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांमुळे एका विशिष्ट जीवनशैलीचे उदात्तीकरण होत असून समाजही आंधळेपणाने तिचे अनुकरण करत आहे.
३. मी केलेल्या निरीक्षणाला कुणी ‘जागतिकीकरणावर केलेली टीका’ असे म्हणू नये. ‘जागतिकीकरणामुळे उद्भवलेल्या समस्या पहाता जागतिकीकरणाच्या ज्या तत्त्वांचा आपण अवलंब केला आहे, त्यामध्ये काही तरी चूक झाली आहे’, असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.
४. ‘संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटने’च्या (‘युनेस्को’च्या) वर्ष २०२१ च्या भाषांच्या अहवालानुसार जगातील अंदाजे ७ सहस्र भाषांपैकी निम्म्या भाषा या शतकाच्या शेवटी नष्ट होऊ शकतात. या भाषा नष्ट झाल्यास आपण त्या भाषांमध्ये लिहिले गेलेले अमूल्य साहित्य केवळ गमावूच, असे नाही, तर अनेक पिढ्यांपासून वारशाने मिळालेले ज्ञानही गमावणार आहेत.