भाजप आणि मनसे दहीहंडी उत्सवातील गोविंदांचा १० लाख रुपयांचा विमा उतरवणार !
मुंबई – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवात सहभागी होणार्या गोविंदांना भाजपने राज्यस्तरावर, तर मनसेने नवी मुंबई स्तरावर १० लाख रुपयांचा विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे आणि मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘अधिकाधिक गोविंदा पथकांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित दहीहंडीचा उत्सव साजरा करावा’, असे आवाहन केले आहे. दहीहंडी फोडतांना थरावरून पडल्याने अनेक गोविंदांनी आजवर आपला जीव गमावला, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. या अपघातामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटते. हे लक्षात घेऊन ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.