परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण आणि प्रार्थना केल्यावर ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या जळगाव येथील श्रीमती उषा बडगुजर (वय ६३ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्मरणाने मनातील भीती दूर होऊन स्थिर आणि आनंदी रहाता येणे
‘काही दिवसांपासून माझ्या मनात पुष्कळ भीती असायची. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा माझा ‘‘परम पूज्य’, असा जप सातत्याने म्हणजे झोपेतही चालू असायचा. मी झोपेतून जागी झाल्यावरही ‘परम पूज्य’ असाच जप आतून चालू असल्याचे मला जाणवायचे. ‘मी माझ्या मनाला गुरुचरणी अर्पण केले आहे आणि गुरुदेवच मला सांभाळत आहेत’, असा माझा भाव असे. त्यामुळे ‘हळूहळू माझी भीती उणावत आहे’, असे मला जाणवले. गुरुमाऊलींचा धावा केल्यामुळेच मला स्थिर आणि आनंदी रहाता आले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सतत अनुभवता येण्यासाठी प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती !
मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करत असे, ‘गुरुदेवा, या अज्ञानी जिवाला तुम्हीच सांभाळा. तुमचे अस्तित्व मला २४ घंटे अनुभवता येऊ दे.’ त्यानंतर मला पुढील अनुभूती आल्या.
अ. एकदा सकाळी मी झोपेतून उठल्यावर ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे’, हा सद्गुरूंचा श्लोक गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर आसंदीवर बसलेले दिसले.
आ. दिवसभर घरात सेवा करतांना मला सर्वत्र परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते. देवपूजा, स्वयंपाक, घरातील स्वच्छता आणि अन्य सेवा करतांना मला परात्पर गुरु डॉक्टर आसंदीवर बसलेले दिसत असल्यामुळे माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती. त्या वेळी माझा भाव जागृत होऊन मला भावाश्रू येत होते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला हे अनुभवायला मिळाले’, याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती उषा बडगुजर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जळगाव (२३.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |