अतीवृष्टीमुळे बाधित होणार्या ग्रामीण भागांतील पुलांच्या अभ्यासासाठी शासनाकडून समिती गठीत !
मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – पावसाळ्याच्या कालावधीमध्ये विशेषत: ग्रामीण भागांत अतीवृष्टीमुळे पूल वाहून जातात. काही वेळा पुलावरून पाणी जाते. यांमुळे पुलाला जोडणार्या दोन्ही बाजूंचे रस्ते बाधित होऊन पुलावरील वाहतूक बंद होते. ग्रामीण भागांत प्रतिवर्षी उद्भवणारी ही मोठी समस्या लक्षात घेऊन राज्यातील क्षतीग्रस्त पुलांचा अभ्यास करण्यासाठी शासनाने एका अभ्यास समितीची स्थापना केली आहे. येत्या १५ दिवसांत ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.
राज्यातील अशा प्रकारच्या पुलांचा अभ्यास करण्यासाठी शासननियुक्त ४ सदस्यीय समितीच्या प्रमुखपदी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधीक्षक अभियंता श्रीमती एन्.एस्. अन्सारी या कामकाज पहाणार आहेत. अतीवृष्टीमध्ये पूल बाधित होऊ नयेत, यासाठी त्यांची उंची आणि पुराचे पाणी वाहून जाण्याच्या दृष्टीने पुलांची योग्य रचना आदी अभ्यास ही समिती शासनाला सादर करणार आहे.