काश्मीर खोर्यातील सायबर (माहिती-तंत्रज्ञान) जिहाद आणि त्यावरील उपाययोजना !
भारताने वेगळ्या संस्थेची उभारणी करणे, हेच माहिती युद्ध जिंकण्यासाठी पूरक ठरणार असणेआज काश्मीरमध्ये माहिती युद्ध जिंकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वेगळी संस्था उभारली पाहिजे. तिचे नेतृत्व एका सैनिकी अधिकार्याकडे दिले पाहिजे. त्यांच्या अखत्यारित सहस्रो तरुण आणि तज्ञ असतील. आतंकवादाच्या विरोधात लिहिणारे चांगले लेखक, ‘व्हिडिओग्राफर’, विशेष प्रभावी तज्ञ, ‘व्हिडिओ’ संपादक, ‘हॅकर्स’ (संकेतस्थळ कह्यात घेणारे), सामाजिक माध्यम तज्ञ, संशोधक, इस्लामिक धर्मशास्त्रातील तज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, गीतकार आणि संगीतकार असे विविध क्षेत्रांतील तज्ञ एकाच छताखाली रहातील. या संस्थेच्या इमारतीत ‘रेकॉर्डिंग स्टुडिओ’, ‘सर्व्हर रूम’, ‘आयटी हार्डवेअर’, ‘सॉफ्टवेअर’, ‘हायस्पीड इंटरनेट’ आणि सामाजिक माध्यमांशी संबंधित सर्व उपकरणे असतील. त्यांनी निर्माण केलेली सामुग्री सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली जाईल. भारताला देशासाठी काम करणार्या सहस्रो काश्मिरी मुसलमान स्त्री-पुरुषांचीही आवश्यकता आहे. ते दूरचित्रवाहिनी, रेडिओ, एफ्.एम्., यू ट्यूब आदींच्या माध्यमातून प्रतिदिन भारताच्या गोष्टी सांगतील आणि ‘भारतातील काश्मिरी हे पाकिस्तानच्या नागरिकांपेक्षा अधिक भाग्यवान आहेत’, हे पटवून देतील. – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन |
पाकिस्तान युद्ध लढण्यासाठी माहिती युद्धाचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. यामध्ये पाकिस्तान काश्मिरी मुले अणि पुरुष यांच्यामध्ये भारतविरोधी अन् जिहादचे विषारी लिखाण प्रसारित करत असतो. या माहिती युद्धाचा भारताने प्रतिकार करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
१. भ्रमणभाष संचाच्या माध्यमातून काश्मिरी मुले आणि पुरुष यांच्यामध्ये विषारी लिखाण पसरवण्यात येणे
‘काश्मीरमधील आतंकवाद हा केवळ काश्मीर खोर्यापुरता सीमित आहे, म्हणजे तो लेह, लडाख, कारगिल, जम्मू, उधमपूर, राजौरी, पूंछ वगैरे भागांत नाही. काश्मीर खोरे हे झेलम नदीचे खोरे आहे. त्याची लांबी अनुमाने १४० किलोमीटर, तर रुंदी अनुमाने ४० किलोमीटर आहे. गेल्या ५ – ६ वर्षांमध्ये ‘तेथे केवळ १५० ते २०० आतंकवादी असावेत’, असे सांगितले जाते. दुसरीकडे भारतीय सैन्य प्रतिवर्षी १५० ते २०० आतंकवाद्यांना ठार मारते. तरीही आतंकवाद्यांची संख्या अल्प होत नाही; कारण त्यांची जागा नवीन आतंकवादी घेतात आणि आतंकवाद चालूच रहातो. दक्षिण काश्मीर हे आतंकवादाचे केंद्र आहे. तेथून प्रवास करत असतांना आपल्यासमोर एक दृश्य वारंवार येते की, तरुण काश्मिरी मुले अणि पुरुष ‘स्मार्टफोन’मध्ये डोके खुपसून चालत असतात. देशातील अन्य तरुण आणि पुरुष यांच्याकडेही त्यांच्याप्रमाणेच भ्रमणभाष संच असतात; पण काश्मिरी मुलांच्या भ्रमणभाष संचांमध्ये शुद्ध विषारी लिखाण प्रसारित केले जाते आणि ते पुष्कळ धक्कादायक असते. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारताकडे विशेष रणनीती नाही.
२. काश्मिरी तरुणांनी आतंकवाद्यांना ‘व्हॉट्सॲप’ गटाद्वारे भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींविषयी सतर्क करणे आणि यातूनच सैन्याचे अभियान अपयशी होण्याची शक्यता असणे
काश्मिरी तरुणांकडून ‘व्हॉट्सॲप’ गटाचा उपयोग केवळ चकमकीच्या ठिकाणी दगडफेक करणार्यांना एकत्र करण्यासाठी केला जात नाही, तर आतंकवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींविषयी सतर्क करण्यासाठीही केला जातो. हे तरुण नेहमी फिरत असतात. त्यांना सैन्याचा ताफा सैन्य छावणीच्या फाटकातून बाहेर पडतांना दिसला की, त्यांच्याकडून त्वरित संदेश प्रसारित केला जातो. त्यात सैन्य आणि वाहने यांची संख्या अन् हालचालींची दिशा आदींविषयी माहिती दिली जाते. काश्मीरमध्ये डोंगराळ भाग असल्याने रस्ते अल्प आहेत. त्यामुळे सैन्य कोणत्या दिशेने जात आहे, हे लगेचच कळते. त्यामुळे भारतीय सैन्याचे अभियान अपयशी होण्याची शक्यता असते.
३. काश्मीरच्या खोर्यात सहस्रो मदरशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आतंकवाद शिकवण्यात येणे आणि तेथे दिल्या जाणार्या शिक्षणातूनच आतंकवाद्यांची निर्मिती होत असणे
काश्मीर खोर्याचे प्रचंड वेगाने जिहादीकरण होत आहे. एकट्या अनंतनागमध्ये ५०० हून अधिक मदरसे आहेत; पण त्यांवर सरकारकडून देखरेख ठेवली जात नाही. तेथील मुलांना काय शिकवायचे ? हेसुद्धा तेच ठरवतात. अशा प्रकारचे सहस्रो मदरसे संपूर्ण काश्मीरमध्ये आहेत. या धार्मिक शिक्षणाच्या शाळांमध्ये काश्मिरी शिक्षक शिकवत नाहीत, तर बाहेरून आलेले लोक शिकवतात. ते आतंकवादी देवबंदी असून ‘जमात-ए-इस्लामी’चे हस्तक आहेत. मदरशांमध्ये ५ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना ‘जिहादचा महिमा’ शिकवला जातो. त्यातील प्रत्येक मूल आतंकवादी होते, असे नाही; पण त्यातील काही मुले कट्टर होतात आणि त्यातीलच काही जण आतंकवादी होतात.
४. पाकिस्तानने सिद्ध केलेल्या विषारी सामुग्रीतून काश्मिरी तरुणांचा बुद्धीभेद केला जाणे
पाकिस्तानने आतंकवाद वाढवण्यासाठी उपलब्ध केलेली सामग्री अतिशय उच्च दर्जाची आहे. तिला आपण ‘सायबर जिहाद’ किंवा ‘ई-जिहाद’ (माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केला जाणारा जिहाद) म्हणू शकतो. ‘पाकिस्तानी सशस्त्र दलांची जनसंपर्क शाखा’ ही या ‘ई-जिहाद’ची जननी आहे. त्यांनी सिद्ध केलेली विषारी सामुग्री काश्मिरी तरुणांच्या ‘स्मार्टफोन’वर प्रसारित होते. त्या माध्यमातून त्यांचा मोठ्या प्रमाणावर बुद्धीभेद केला जातो.
५. भारतीय सैन्याने विशेष मोहिमा राबवून विदेशी आतंकवाद्यांचा महापूर थांबवणे
काही वर्षांपूर्वी आम्ही काश्मीरमध्ये तैनात होतो. तेव्हा आमच्या विदेशी आतंकवाद्यांसमवेत चकमकी व्हायच्या. त्यात बहुतांश अफगाणी, सुदानी किंवा पाकिस्तानी असायचे. ते स्वर्ग शोधण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी काश्मिरी महिलांवर बलात्कार केले, तसेच अनेक निरपराध्यांना ठार मारले. कालांतराने भारतीय सैन्याने विशेष मोहिमा राबवून विदेशी आतंकवाद्यांचा महापूर थांबवण्यात यश मिळवले. आता काश्मीरमधील बहुसंख्य आतंकवादी हे स्थानिक आहेत. पाकिस्तान काश्मीरमधील तरुणांना जिहादच्या नावाखाली आतंकवादी बनवतो. त्यांना आतंकवादी संघटनांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यांच्या मनात दुसरा विचार येऊ नये; म्हणून त्यांची सामाजिक माध्यमांमध्ये शस्त्रास्त्रांसह छायाचित्रे प्रसारित केली जातात. त्यामुळे सुरक्षादलांकडून त्यांना चिन्हांकित केले जाते आणि एक दिवस सैन्याशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू होतो.
६. स्थानिक तरुणांना आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यात येत असल्याने त्यांची संख्या कधीच न घटणे
अशा प्रकारे काश्मीर खोर्यातील आतंकवाद्यांचे आयुष्य ६ ते ८ मासांपेक्षा अल्प असते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या अंत्यसंस्कारांचे आयोजन केले जाते. ही अंत्ययात्रा म्हणजे आतंकवादी संघटनांचा भरती मेळावाच असतो. त्यामुळे ठार झालेल्या आतंकवाद्यांची जागा नवीन आतंकवादी घेतात आणि त्यांची संख्या अल्प न होता वाढतच रहाते. अशा प्रकारे आतंकवादाचे हे न संपणारे दुष्टचक्र सदैव चालू असते.
७. माहिती युद्धाच्या विरोधात भारत कमकुवत पद्धतीने लढत असणे
पाकिस्तान युद्ध लढण्यासाठी माहिती युद्धाचा शस्त्र म्हणून वापर करत आहे. या युद्धाच्या विरोधात भारत अतिशय कमकुवत पद्धतीने लढत आहे. जगभरात भारताच्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार युद्ध लढले जाते. विदेशातील ‘हँडल’ (भारतविरोधी लोकांची सामाजिक माध्यमांवरील खाती) भारताला शिव्या देत असतात. भारताविषयी चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात, उदा. भारत विदेशात गहू देण्यास सिद्ध नाही इत्यादी. खरेतर सत्य हे आहे की, भारताने ११ लाख टन गहू लहान देशांना दिला आहे. काश्मीरमध्ये भारताला भेडसावणार्या बहुतांश समस्यांना सामाजिक माध्यमे कारणीभूत आहेत. भारताने त्यांच्याशी पुष्कळ आधीपासून लढायला हवे होते. आताही अपेक्षित स्तरावर लढाई होत नाही.
८. भारतातील सर्व मंत्रालये, गुप्तचर संस्था आणि माहिती विभाग यांनी काश्मीरमधील सायबर युद्ध एकत्रितपणे चालवणे आवश्यक !
अ. भारताच्या विरोधातील प्रचाराशी लढण्यासाठी भारत समर्थक सामुग्रीची निर्मिती करणारे सहस्रो ‘ट्विटर हँडल’, ‘फेसबूक प्रोफाईल’, ‘इंस्टाग्राम’ खाती, ‘ब्लॉग’, संकेतस्थळे आणि ‘व्हॉट्सॲप’ गट सिद्ध करणे आवश्यक आहे. भारताची योग्य माहिती देणे आणि स्थानिक काश्मिरी माध्यमांचे व्यवस्थापन करणे, ही तात्काळ असलेली आव्हाने आहेत. काश्मिरी माध्यमांमध्ये प्रतिकथनाच्या माहितीचा पूर येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यात अपप्रचार वाहून जाईल. काश्मीरच्या खोर्यात रहाण्यासाठी कार्यकर्ता काश्मिरी असणे आवश्यक आहे. काश्मीर खोर्याच्या बाहेरील पत्रकार श्रीनगरमध्ये राहिल्यास त्यांना इजा होण्याची किंवा मारले जाण्याची भीती वाटते. त्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमे बाहेर किंवा देहलीत राहून वृत्ते देतात. बहुतेक स्थानिक काश्मिरी माध्यमे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मागे लपून अफवा पसरवणे, टोमणे मारणे आणि खोटे बोलणे असे प्रकार करतात.
आ. अनेक स्थानिक पत्रकार हे पाकिस्तानच्या वेतनावर असतात. त्यामुळे काश्मीरमध्ये खासगी दूरचिवाहिन्यांची आवश्यकता आहे, तसेच तेथे भारतीय माहिती सांगणारी काश्मिरी आणि उर्दू भाषांमधील वर्तमानपत्रे निघणेही आवश्यक आहे. आता सर्व माध्यमांद्वारे काश्मिरी जनतेवर लक्ष ठेवायला पाहिजे. ‘काश्मीर खोर्यात अभियंते, आधुनिक वैद्य आणि खेळाडू बनतील; पण आतंकवादी सिद्ध होणार नाहीत’, असे शिक्षण देणे आवश्यक आहे. भारतातील सर्व मंत्रालये, गुप्तचर संस्था आणि माहिती विभाग यांनी हे युद्ध एकत्रितपणे लढले पाहिजे.
९. काश्मीरमध्ये शत्रूचा पराभव केवळ मैदानातच नव्हे, तर माहिती युद्धातही झाल्यास भारताला आतंकवादाच्या विरोधातील लढाई जिंकता येईल !
आज प्रत्येक भारतीय सैनिकाकडे एके-४७ सह भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि ‘स्मार्टफोन’ असला पाहिजे. भारतीय सैन्याएवढी क्षमता कोणत्याही सैनिकाची नाही. ते प्रत्येक गोष्ट शिस्तीने आणि सांगितली तशीच करतात. ‘एके ४७’ बंदुकीच्या माध्यमातून आतंकवाद्यांना मारता येते; पण एखादी विषारी कल्पना मारता येत नाही. त्याला दुसर्या चांगल्या कल्पनेनेच मारावे लागते; म्हणून काश्मीरची लढाई जिंकायची असेल, तर भारताच्या बाजूने भांडणार्या प्रतिकथनाची आवश्यकता आहे. वर्ष २००० पासून या माहिती युद्धाविषयी केवळ बोलले जाते; पण कारवाई केली जात नाही. आपल्या शत्रूचा माहिती युद्धातही पराभव होणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांची ही लढाई केवळ भारतापुरती सीमित न रहाता ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि अन्य पाकिस्तानमध्येही पोचायला हवी. असे झाले, तरच आपल्याला लढाई जिंकता येईल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे
संपादकीय भूमिकापाकिस्तानकडून भारताच्या विरोधात चालू असलेल्या माहिती युद्धाला त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देणे आवश्यक ! |