गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा बंदोबस्त करा ! – करवीर शिवसेना
गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर), ५ ऑगस्ट (वार्ता.) – गांधीनगर परिसरात उंचगावसह मणेरमळा, सरनोबतवाडी या भागांत परप्रांतियांकडून मोठ्या प्रमाणात टेहाळणी करून रात्री चोर्या करणे, बनावट माल विकणे, मारामार्या करणे असे अनेक प्रकार घडत आहेत. या परप्रांतियांची कोणतीही नोंद संबंधित भागातील पोलीस ठाणे अथवा ग्रामपंचायती यांमध्ये नसल्याने या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच गांधीनगरमध्ये अनेक दुकाने फोडण्यासह हातातील रोकड हिसकावून नेण्याचा प्रकार घडला आहे. तरी गांधीनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना देण्यात आले.
पोलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या हद्दीतील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बैठक घेऊन नवीन व्यक्तीचे ओळखपत्र पडताळणे आणि ग्रामपंचायतीमध्ये नोंद ठेवणे, अशा कृती अपेक्षित आहेत. या परप्रांतियांसमवेत बांगलादेश आणि नेपाळ येथूनही नागरिक गांधीनगर बाजारपेठेत येतात. त्यांच्याकडे आधारकार्डसह अन्य कसलाच रहिवासी दाखला नसतो. अशांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा. असे न झाल्यास भविष्यात येथील भूमीपुत्रांना जगणे अवघड होईल. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, सर्वश्री पोपट दांगट, विक्रम चौगुले, राहुल गिरुले, जितु कुबडे, वीरेंद्र भोपळे, विनोद रोहिडा, बाळासाहेब नलवडे, शिवाजी लोहार यांसह अन्य उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअसे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून का नोंद घेत नाही ? |