महागाईच्या विरोधात विधीमंडळाच्या बाहेर आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी कह्यात !
मुंबई – महागाईच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या बाहेर आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. महागाईच्या विरोधात ५ ऑगस्ट या दिवशी काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधीमंडळाच्या ठिकाणी काँग्रेसचे प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. विधीमंडळ ते राजभवन असा मोर्चा काँग्रेसकडून काढण्यात येणार होत; परंतु मोर्चा काढण्यापूर्वीच पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. पोलिसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आदी प्रमुख नेत्यांसह काँग्रेसच्या अन्य पदाधिकार्यांना कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकासत्तेत असतांना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आणि निवडणूक हरल्यानंतर जनताभिमुख असल्याचे भासवणे ही सर्वपक्षियांची नीती जनता ओळखून आहे. सत्ताकाळात महागाई रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली असती, तर काँग्रेसच्या आंदोलनाला नैतिकता प्राप्त झाली असती ! |