शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून समन्स !
मुंबई – बलात्कार पीडितेला धमकावल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्या विरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘या प्रकरणी तक्रार न करण्यासाठी दिघे यांनी धमकावले होते’, अशी तक्रार तरुणीने प्रविष्ट केली होती. आरोपी कपूर याला अटक करण्यासाठी पोलीस पथक देहली येथे गेले आहे.
याच प्रकरणामध्ये दिघे यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्वीट करत चेतावणी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हा शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे. ठाणे हा शिवसेना आणि दिघेसाहेब यांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांवर सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल किंवा दबाव टाकाल, तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील घरावर शिवसैनिकांसह मोर्चा काढावा लागेल !’’