खासदार संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स !
मुंबई – पत्राचाळ प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) शिवसेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे समन्स पाठवले आहे. या प्रकरणी वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.
संचालनालयाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयामध्ये सांगितले की, संजय राऊत हे यापूर्वी झालेल्या चौकशीच्या वेळी सर्व माहिती देण्यास टाळाटाळ करत होते; मात्र त्यांच्या घरावर धाड टाकली, तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यावरून असे दिसते की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे.
पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना एच्डीआयएल् ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यांतील १ कोटी ६ लाख ४४ सहस्र रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले आहेत, अशी माहिती या अधिवक्त्यांनी न्यायालयात दिली होती.
ईडीचा दावा काय आहे ?
पत्राचाळ पुनर्विकास आणि ‘एफ्.एस्.आय.’ घोटाळा या प्रकरणांत प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंट मॅन’ म्हणून कार्यरत होते. आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरित्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये हे संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांकडे थेट गेले असल्याचे आतापर्यंतच्या अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते’, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यापूर्वीच न्यायालयात केला आहे.