एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवून त्यांचे नैतिक बळ वाढवूया ! – ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’चे आवाहन
कोल्हापूर, ४ ऑगस्ट (वार्ता.) – कारगील युद्धापासून गेली २३ वर्षे ‘एक राखी सीमेवरील जवानांसाठी’ हा देशरक्षाबंधनाचा उपक्रम ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ राबवत आहे. २ वर्षे कोरोना महामारीच्या काळातही राख्या पाठवण्यात आल्या. याच प्रकारे यंदाही विविध संकलन केंद्रांवर या राख्या संकलित करून त्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. तरी एक राखी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवून त्यांचे नैतिक बळ वाढवूया, असे आवाहन ‘श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, सचिव श्री. राजेंद्र मकोटे, सदस्य सौ. सीमा जोशी, श्री. कमलाकर किलकिले, श्री. मालोजी केरकर, श्री. सुखदेव गिरी यांनी पत्रकार परिषदेत केले.
श्री. घाटगे पुढे म्हणाले, ‘‘राखी बांधणारे हात वाचले, तर देश वाचेल. त्यामुळे नागराज पेपर स्टॉल-शुक्रवार गेट, कामत झेरॉक्स-शहाजी कॉलेज, भिवटे पोहे सेंटर-महाद्वार रोड, भगिनी मंच-शनिवार पेठ, मैत्रीण मंच- समर्थ ज्वेलर्स यांसह अन्य ठिकाणी असलेल्या राखी संकलन केंद्रांवर नागरिकांनी या राख्या द्याव्यात. जमा झालेल्या या राख्या ९ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११.३० वाजता जिल्हा सैनिक कार्यालय परिसरात जिल्हा सैनिक अधिकार्यांकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत.’’